श्रीलंकेत सर्वांचा आदर व्हावा
By Admin | Updated: March 15, 2015 01:44 IST2015-03-15T01:44:27+5:302015-03-15T01:44:27+5:30
श्रीलंकेतील सर्व नागरिकांचा आदर राखत समान विकास करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

श्रीलंकेत सर्वांचा आदर व्हावा
मोदी यांची जाफना भेट : बेघर तामिळींना सुपूर्द केली २७ हजार घरे
जाफना : श्रीलंकेतील सर्व नागरिकांचा आदर राखत समान विकास करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. श्रीलंकन फौजा आणि लिट्टे यांच्यातील युद्धात तामिळींचे वर्चस्व असलेले जाफना बेट पार उद्ध्वस्त झाले होते. या बेटाला भेट देऊन पंतप्रधान मोदी यांनी भेट देऊन तेथील लोकांचे अश्रू पुसत भारताच्या मदतीने उभारण्यात आलेली २७ हजार घरे यादवीत बेघर झालेल्या तामिळींना सुपूर्द केली.
२०१३ मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी जाफना बेटाला भेट दिली होती. त्यानंतर या बेटाला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे दुसरे आंतरराष्ट्रीय नेते होय. जाफना बेटाला भेट देऊन मोदी यांनी आपल्या दोन दिवसीय श्रीलंका दौऱ्याची सांगता केली.
श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांच्यासोबत त्यांनी कोलंबो येथे चर्चा केल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी जाफनाला भेट दिली.
तामिळींना अधिकार देण्यासंबंधीची १३ वी घटनात्मक दुरुस्ती लवकरात लवकर आणि पूर्णत: अमलात आणावी, तसेच त्या पलीकडे त्यांच्या समस्यांवर राजकीय तोडगा काढावा, असे आवाहन मोदी यांनी श्रीलंका सरकारला केले.
त्यांच्या हस्ते येथे एका सांस्कृतिक केंद्राची पायाभरणी करण्यात आली. एकता, शांती आणि सौहार्द समान विकासाचे तत्त्व असून सर्व नागरिकांचा आदर केला जावा, असे मोदी म्हणाले.
तत्पूर्वी, मोदी यांच्या हस्ते तलाईमन्नार येथे एका रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला. दोन दशकांच्या यादवीनंतर ही रेल्वेसेवा सुरू झाली आहे. तलाईमन्नार भारताच्या अगदी निकट आहे. या रेल्वेसेवेमुळे उत्तर श्रीलंकेतील नव्याने लोहमार्ग टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.
अनुराधापूर : श्रीलंकेची प्राचीन राजधानी असलेल्या अनुराधापूरला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे पवित्र महाबोधी वृक्ष मंदिरात पूजा केली.
यावेळी त्यांच्यासमवेत श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना होते. मोदी हे या मंदिरात अर्धा तास होते. तेथून ते रवनवेलिसेया स्तूप पाहण्यासही गेले.