Did You Know: 'झेंडा फडकवणे' आणि 'ध्वजारोहण' यात फरक काय? २६ जानेवारीला यापैकी काय करतात? माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 16:21 IST2025-01-24T16:19:13+5:302025-01-24T16:21:03+5:30
Republic Day 2025 Celebration: २६ जानेवारी आणि १५ ऑग्स्ट या दोन्ही दिवशी तिरंगा फडकवण्याची पद्धत अतिशय वेगळी असते, पण नेमकी कशी ते जाणून घ्या.

Did You Know: 'झेंडा फडकवणे' आणि 'ध्वजारोहण' यात फरक काय? २६ जानेवारीला यापैकी काय करतात? माहीत आहे का?
तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज, तो उभारण्याची आणि खाली उतरवण्याची विशिष्ट पद्धत असते. एवढेच नाही तर ध्वज कसाही गुंडाळून चालत नाही तर त्याची घडी घालण्याचीही विशिष्ट पद्धत असते. या नियमांचे उल्लंघन झाले तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. म्हणूनच प्रजासत्ताक दिनाला आणि स्वातंत्र्य दिनाला या विषयांची सखोल माहिती असणाऱ्या व्यक्तीकडे नियोजनाची जबाबदारी सोपवली जाते. मग तो एखादा स्थानिक कार्यक्रम असो नाहीतर राष्ट्रीय! असाच एक मुख्य नियम या दोन दिवसांच्या बाबतीत पाळला जातो, तो म्हणजे ध्वज फडकवण्याचा. त्याचे वेगळेपण नेमके काय ते जाणून घेऊ.
दोन दिवसांचा मान दोन व्यक्तींना :
प्रजासत्ताक दिनाला कर्तव्य पथावर राष्ट्रपती ध्वज फडकवतात, तर स्वातंत्र्य दिनाला देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. त्यामुळे येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ध्वज फडकवताना आपल्याला दिसतील.
या दोन्ही पद्धतींची नावेही वेगळी:
१५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) आणि २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) रोजी फडकवलेल्या ध्वजांची नावेदेखील भिन्न आहेत. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान ध्वजारोहण करतात, ज्याला इंग्रजीत Flag Hoisting म्हणतात. तसेच, प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती ध्वज फडकवतात, ज्याला इंग्रजीत Flag Unfurling म्हणतात. म्हणजे १५ ऑगस्टला ध्वजारोहण आणि २६ जानेवारीला ध्वज फडकवला जातो.
दोन्हीमध्ये काय फरक?
आता ध्वजारोहण आणि ध्वज फडकावणे, यातील फरक जाणून घेऊ. १५ ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात, तेव्हा ध्वज खांबाच्या तळाशी असतो आणि पंतप्रधान दोरी ओढतात, तेव्हा तो हळुहळू वर जातो आणि फडकवला जातो. म्हणजेच, ध्वजारोहणात ध्वज खांबाच्या खालच्या वरच्या दिशेने सरकतो. हे लाल किल्ल्यावर घडते. हे राष्ट्रीय उत्थान, देशभक्ती आणि स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. तर, २६ जानेवारीला ध्वज फडकवला जातो, तेव्हा ध्वज खांबाच्या वरच्या बाजूला बांधलेला असतो. राष्ट्रपती दोरी ओढतात आणि झेंडा हवेत फडकतो. हे आपल्या राज्यघटनेच्या तत्त्वांप्रती असलेली आपली बांधिलकी दर्शवते.