काशी विश्वनाथ मंदिराप्रमाणे ज्ञानवापीची निर्मिती; ३ रहस्यांची उकल नाही, ASI काय म्हणतेय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 09:37 AM2024-01-28T09:37:33+5:302024-01-28T09:37:51+5:30

ASI Survey Report on Gyanvapi: एएसआयच्या सर्व्हेतून ज्ञानवापीबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे.

reports says gyanvapi is built in nagara style like kashi vishwanath temple and ayodhya ram mandir | काशी विश्वनाथ मंदिराप्रमाणे ज्ञानवापीची निर्मिती; ३ रहस्यांची उकल नाही, ASI काय म्हणतेय?

काशी विश्वनाथ मंदिराप्रमाणे ज्ञानवापीची निर्मिती; ३ रहस्यांची उकल नाही, ASI काय म्हणतेय?

ASI Survey Report on Gyanvapi: काशी विश्‍वनाथ मंदिराला लागून असलेल्या ज्ञानवापी परिसरात भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण (एएसआय) विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, ज्ञानवापीच्या सध्याच्या रचेनेपूर्वी येथे भव्य हिंदू मंदिर होते, असे संकेत मिळतात. हा अहवाल सर्वाजनिक झाल्यानंतर, आता हिंदूंना तेथे पूजा-अर्चना करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी हिन्दू पक्षकारांकडून करण्यात आली आहे. यातच आता ज्ञानवापीबाबत नवनवीन माहिती मिळत आहे.

एएसआयच्या सर्वेक्षण अहवालात ज्ञानवापीचे वर्णन नागर शैलीतील मंदिर असे करण्यात आले आहे. काशी विश्वनाथ मंदिरही याच शैलीत बांधलेले आहे. अयोध्येतील रामललाचे मंदिरही सुरुवातीला नागर शैलीत बांधले गेले. सर्वेक्षण अहवालानुसार, मंदिराची रचना अयोध्येत बांधलेल्या राम मंदिरासारखीच आहे. प्रवेशद्वारानंतर दोन मंडप आणि गर्भगृहाची संकल्पना करण्यात आली आहे. नागर शैलीत बांधलेल्या अयोध्येतील रामललाच्या मंदिरातही प्रवेशानंतर मंडप असून शेवटी गर्भगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्ञानवापी येथे पूर्वेकडे मंदिर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, तो भाग बंद असल्याने एएसआयच्या पथकाला पुढील सर्वेक्षण करता आले नाही, असे समजते.

तीन रहस्यांची उकल होण्याची हिंदू पक्षाची मागणी

एएसआयच्या अहवालातून तीन रहस्ये समोर आली आहेत. आता हिंदू पक्ष ही गुपिते उघड करण्याची मागणी करेल. वास्तविक एएसआयने सांगितले की, पूर्वेकडील भाग बंद करण्यात आला आहे. येथे एक विहीर सापडली आहे. मंजू व्यास, रेखा पाठक, लक्ष्मी देवी आणि सीता साहू यांचे म्हणणे आहे की, पूर्वेकडील भाग का बंद आहे हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच सापडलेल्या विहिरीचे महत्त्व काय आणि तिथे काय आहे, याबाबत माहिती मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच वाजूखानाच्या एएसआय सर्वेक्षणाची मागणी न्यायालयात करण्यात येणार आहे.

दरम्यान, इस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी जेम्स प्रिन्सेप यांनी आपल्या पुस्तकात ज्ञानवापी मंदिर असल्याचा दावा केला होता. बनारस इलस्ट्रेटेड या पुस्तकात विश्वेश्वर मंदिराचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. पुस्तकात जेम्स प्रिन्सेपने पुराव्यासह माहिती सादर करण्यासाठी लिथोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. जेम्स प्रिन्सेपच्या नकाशानुसार, मंदिर १२४ फूट चौरस होते आणि त्याच्या चार कोपऱ्यांवर मंडप होते. मध्यभागी एक मोठे गर्भगृह आहे, ज्याचे वर्णन नकाशात मंडपम असे केले आहे. पण, ASI अहवालात तयार मंदिर जेम्स प्रिन्सेपच्या नकाशापेक्षा वेगळे आहे, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: reports says gyanvapi is built in nagara style like kashi vishwanath temple and ayodhya ram mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.