प्रख्यात वकील हरिश साळवे यांनी ६८ व्या वर्षी केलं तिसरं लग्न, पाहा कोण आहे त्यांची नवी जोडीदार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 12:18 IST2023-09-04T12:18:44+5:302023-09-04T12:18:55+5:30
Harish Salve : प्रख्यात वकील हरिश साळवे यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी तिसरं लग्न केलं आहे. साळवे यांनी याआधी २०२०मध्ये दुसऱ्यांदा लग्न केलं होतं. हरिश साळवे यांनी हल्लीच संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यामध्ये ट्रिना यांच्याशी विवाह केला आहे.

प्रख्यात वकील हरिश साळवे यांनी ६८ व्या वर्षी केलं तिसरं लग्न, पाहा कोण आहे त्यांची नवी जोडीदार?
प्रख्यात वकील हरिश साळवे यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी तिसरं लग्न केलं आहे. साळवे यांनी याआधी २०२०मध्ये दुसऱ्यांदा लग्न केलं होतं. हरिश साळवे हे केंद्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या वन नेशन-वन इलेक्शन समितीचेही सदस्य आहेत. हरिश साळवे यांनी हल्लीच संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यामध्ये ट्रिना यांच्याशी विवाह केला आहे. याआधी त्यांनी मीनाक्षी (पहिली पत्नी) आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड (२०२०) यांच्याशी विवाह केला होता. हरिश साळवे आणि त्यांची पहिली पत्नी मीनाक्षी यांनी लग्नाच्या ३८ वर्षांनंतर जून २०२० मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यांना साक्षी आणि सानिया या दोन कन्या आहेत.
हरिश साळवे यांच्या तिसऱ्या विवाहसोहळ्याला नीता अंबानी, ललित मोदी आणि उज्ज्वला राऊत यांच्यासह त्यांची जवळची मित्रमंडळी आणि कुटुंबीय उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या हरिश साळवे यांनी कुलभूषण जाधव खटल्यासह काही अन्य हायप्रोफाइल प्रकरणांमध्ये वकिली केली आहे. जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी लष्करी कौर्टाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. साळवे यांनी जाधव यांचा खटला लढण्यासाठी केवळ एक रुपया मानधन घेतलं होतं. त्यासाठी त्यांची खूप प्रशंसा झाली होती. टाटा समूह, मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसी समूह त्यांचे काही प्रमुख अशील आहेत.
हरिश साळवे यांनी २००२ च्या हिट अँड रन खटल्यामध्ये २०१५ मध्ये सलमान खानचे वकील म्हणून काम पाहिले होते. सलमान खान याला आधी ५ वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र २०१५ मध्ये त्याला सर्व आरोपातून मुक्त करण्यात आले होते. हरिश साळवे यांनी १९९९ ते २००२ या काळात भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांना वेल्स आणि इंग्लंडच्या कोर्टामध्ये राणीचे वकील म्हणून नियुक्त करण्यात आले होते. सध्या देशातील सर्वात प्रभावी वकील म्हणून हरिश साळवे यांची ओळख आहे.