"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 17:38 IST2025-11-01T17:37:10+5:302025-11-01T17:38:34+5:30
Delhi renamed Indraprastha: राजधानी दिल्लीचे नामांतर करण्याची मागणी होत आहे. आता भाजप खासदाराने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवले आहे. पांडवांचा उल्लेख करत त्यांनी नामांतर करण्याची मागणी केली आहे.

"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
Delhi Renamed Indraprastha Amit Shah: दिल्लीतील चांदणी चौक मतदारसंघाचे भाजपचे खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी दिल्लीचे नामांतर करण्याची मागणी केली आहे. दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ करण्यात यावे, अशी मागणी खंडेलवाल यांनी केली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र दिले आहे.
भाजप खासदार खंडेलवाल यांनी जुन्या दिल्लीतील रेल्वे स्थानकाचे नावही बदलून इंद्रप्रस्थ जंक्शन आणि दिल्ली विमानतळाचे नाव बदलून इंद्रप्रस्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याची मागणीही केली आहे. दिल्ली विमानतळाचे नाव इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
दिल्लीचा इतिहास पांडवांशी जोडलेला
भाजप खासदार खंडेलवाल यांनी म्हटले आहे की, दिल्लीचा इतिहास थेट पांडव्यांच्या काळाशी जोडलेला आहे. दिल्लीची संस्कृती, सभ्यता, वारसा आणि परंपरा इंद्रप्रस्थ नावाशी जोडलेली आहे.
यमुनेच्या काठावरच इंद्रप्रस्थ वसवले गेले
खंडेलवाल यांनी म्हटले आहे की, पांडवांनी यमुनेच्या काठावरच राजधानी इंद्रप्रस्थ वसवली होती. त्यामुळे दिल्लीतील प्रमुख ठिकाणी पांडवांच्या मूर्ती बसवल्या जाव्यात. यातून तरुण पिढीला पांडवांची संस्कृती आणि पंरपरांविषयी कळेल.
मौर्य ते गुप्त काळापर्यंत इंद्रप्रस्थ व्यापार, संस्कृती आणि प्रशासनाचे प्रमुख केंद्र राहिलेले आहे. ११व्या आणि १२व्या शतकात राजपूत कालखंडात तोमर राजांनी इंद्रप्रस्थचा उल्लेख डिल्लिका असा केला. त्यानंतर दिल्ली हे नाव पुढे रुळले.
इंद्रप्रस्थ म्हणून सन्मान केला गेला पाहिजे
"देशातील प्रयागराज, अयोध्या, उज्जैन, वाराणसी ही शहरे प्राचीन संस्कृतीशी जोडली जात आहेत. या ऐतिहासिक शहरांप्रमाणे दिल्लीलाही तिचा मूळ सन्मान मिळाला पाहिजे. इंद्रप्रस्थ म्हणून हा सन्मान मिळाला पाहिजे. हे परिवर्तन ऐतिहासिक न्याय असेल. सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असेल", असे खंडेलवाल यांनी अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
विश्व हिंदू परिषदेनेही काही दिवसांपूर्वी दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ करण्याची मागणी केली होती. दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा यांना नामांतर करण्याचे पत्र दिले होते.