पँट काढली, मुळव्याधीच्या शस्त्रक्रियेचा पुरावा दाखवला, तरीही लोको पायलटला रजा नाकारली, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 14:07 IST2026-03-04T14:06:47+5:302026-03-04T14:07:11+5:30
Indian Railway News: मुळव्याधीची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही एका लोको पायलटला वैद्यकीय रजा नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रेल्वेच्या लखनौ विभागातून समोर आला आहे.

पँट काढली, मुळव्याधीच्या शस्त्रक्रियेचा पुरावा दाखवला, तरीही लोको पायलटला रजा नाकारली, त्यानंतर...
मुळव्याधीची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही एका लोको पायलटला वैद्यकीय रजा (सिक लीव्ह) नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रेल्वेच्या लखनौ विभागातून समोर आला आहे. रजा नाकारण्यात आल्याने वैतागलेले लोको पायलट राजेश मीणा यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर पँट काढून शस्त्रक्रियेचा पुरावाही दाखवला. या घटनेचा व्हिडीओ रेल्वे कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल होत असून, याबाबत रेल्वे कर्मचारी संघटननांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोशिएशन (एआयएलआरएसए) च्या नेत्यांनी सांगितलेकी, राजेश मीणा हे अनुसूचित जमातीमधील आहेत. त्यांनी २२ फेब्रुवारी रोजी लखनौमध्ये मुळव्याधीवर शस्त्रक्रिया करून घेतली होती. त्यांना २२ ते २८ फेब्रुवारीदरम्यान सुट्टी देण्यात आली होती. मात्र शस्त्रक्रियेमुळे झालेली जखम पूर्णपणे बरी न झाल्याने त्यांनी रेल्वेच्या हेल्थ युनिटकडे निर्धारित प्रक्रियेनुसार सुट्टी वाढवण्याची विनंती केली होती. डॉक्टरांनी मीणा यांची तपासणी केल्यानंतर त्यांची रजा वाढवण्याची आवश्यकता असल्याचे मान्य केले, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सिक मेमो आणण्यास सांगितले.
राजेश मीणा यांनी आधी क्रू कंट्रोलर आणि नंतर चीफ क्रू कंट्रोलर रतन कुमार यांच्याशी संपर्क साधला. मात्र मीणा यांनी आपली वैद्यकीय कागदपत्रे, लॅब रिपोर्ट आणि शस्त्रक्रियेच्या जखमेवरील ड्रेसिंग दाखवली, मात्र त्यांना रजा नाकारण्यात आली. त्यामुळे अखेरीस राजेश मीणा यांनी वैतागून आपले कपडे उतरवले, असा आरोप युनियनकडून करण्यात आला आहे. त्यानंतर एका युनियनच्या नेत्याने या प्रकरणाची दखल घेऊन हस्तक्षेप केल्यानंतर मीणा यांना आराम करण्यासाठी रजा देण्यात आली.
या प्रकाराबाबत एआयएलआरएसएचे सरचिटणीस के. सी. जेम्स यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, एका लोको पायलटला वैद्यकीय रजेसाठी या पातळीपर्यंत जावं लागलं, ही बाब लाजीरवाणी आहे. यासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारावई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणी उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाच्या विभागीय व्यववस्थापकांकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या प्रकारामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.