प्रसारमाध्यमांशी बोलाल तर याद राखा ! एअर इंडियाची कर्मचाऱ्यांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 14:21 IST2019-05-03T14:20:09+5:302019-05-03T14:21:20+5:30
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी विमानात चित्रफिती सोशल मिडीयावर टाकणे, तसेच कंपनीविरोधात बोलणे आदी प्रकार केले होते.

प्रसारमाध्यमांशी बोलाल तर याद राखा ! एअर इंडियाची कर्मचाऱ्यांना धमकी
नवी दिल्ली : आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या एकमेव भारतीय विमान कंपनी एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. प्रसारमाध्यमे, सोशल मिडीय़ावर आपल्या प्रतिक्रिया द्याल तर याद राखा, मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या लेखी परवानगीशिवाय बोलल्यास कारवाईची धमकी दिली आहे.
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी विमानात चित्रफिती सोशल मिडीयावर टाकणे, तसेच कंपनीविरोधात बोलणे आदी प्रकार केले होते. याविरोधात कर्मचाऱ्यांना 30 एप्रिलला हा इशारा देण्यात आल्याचे एका वृत्त एजन्सीने म्हटले आहे.
या आदेशामध्ये कंपनीचा कोणताही कर्मचारी मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या लेखी परवानगीशिवाय खासगीरित्या, कंपनीविरोधात किंवा कामगार संघटनेच्या नावावर बोलू शकणार नाही. तसेच ना ही कंपनीच्या संबंधित कोणताही व्हिडीओ पोस्ट करेल. या आदेशाचे उल्लंघन केल्यास गंभीर दखल घेतली जाईल आणि नियमांनुसार कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
एअर इंडियाच्या कामगार संघटनांनी नुकसानीत चाललेल्या एअरलाईनच्या खासगीकरणाच्या प्रयत्नांवर सार्वजनिकरित्या विरोध दर्शविला होता. सरकारने गेल्यावर्षी एअर इंडियामधील हिस्सा विकण्य़ाचा प्रयत्न केला होता, मात्र कोणीही खरेदीदार पुढे आला नव्हता.