Delhi Election: धार्मिक कटुतेला लोकांनी ठोकरले; भाजपच्या पराभवाची मालिका सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 08:17 IST2020-02-12T05:27:11+5:302020-02-12T08:17:45+5:30
दिल्लीच्या निकालावर शरद पवार यांची प्रतिक्रिया : समविचारी पक्षांनी एकत्र यावे

Delhi Election: धार्मिक कटुतेला लोकांनी ठोकरले; भाजपच्या पराभवाची मालिका सुरू
पुणे/मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीमधे आम आदमी पार्टीला (आप) लोकांनी पुन्हा संधी देऊन विकासाला मत दिले असून, धार्मिक कटुता पसरविणाऱ्या प्रचाराला ठोकरले आहे. भारतीय जनता पार्टी ही आपत्ती असल्याचे लोकांना पटले असून त्यांच्या पराभवाची मालिका थांबेल असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करताना ते म्हणाले, केजरीवाल यांनी वीजबिल, पाणीपट्टी, शिक्षणपद्धतीत सुधारणेसाठी घेतलेल्या निर्णयाला मतदारांनी साथ दिली. हा निकाल म्हणजे अहंकाराला दिलेली चपराक आहे. शाहीनबागमधे जे सुरू होते, ते पाहता भाजपाचा पराभव निश्चितच होता.
भाजपाने धार्मिक कटुता वाढेल याची जाणीवपूर्क काळजी घेतली. ‘त्यांना मारा, त्यांना गोळी घाला...’ अशा घोषणाही दिल्या गेल्या. मात्र लोकांनी ते मान्य केले नाही. दिल्लीवासीयांनी दिलेला कौल हा केवळ त्या राज्यापुरता मर्यादित नाही. इतर राज्यातही त्याचे पडसाद उमटतील. त्यामुळे भाजपाची पराभवाची मालिका थांबेल असे वाटत नाही. आता आम्हा लोकांची जबाबदारी आहे. इथून पुढे किमान समान कार्यक्रम घेऊन काम करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
देशातील समविचारी पक्षांचे नेते मिळून याविषयी नक्कीच विचार करू. भाजपामध्येही मोदी-शहा यांच्याबद्दल दहशत आहे. त्याच पक्षातील खासदारांना ‘तुमचे कसे चालले आहे’ असे विचारले असता, तेही इकडे-तिकडे बघून कोणी ऐकत नसल्याची
खबरदारी घेऊन बोलतात. संसदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत दहशतीचे वातावरण असल्याचे जाणवते, असेहीे पवार यांनी सांगितले.
प्रादेशिक पक्षांची वाढती ताकद
पंजाबसह उत्तरेतील काही राज्ये आणि दक्षिणेत तमिळनाडू, ओरिसामध्ये भाजपाला पर्यायी पक्षांची ताकद वाढत आहे. डाव्यांचीही ताकद वाढत आहे.
च्महाराष्ट्रात झालेला प्रयोग आपल्याकडे व्हावा अशी लोकांची इच्छा आहे. लोकांना एकसमान विचाराचा कार्यक्रम मांडण्याची अपेक्षा आहे.
च्देशभरातच हा विचार दिसून येत आहे. त्यामुळे त्या विरोधात एकत्र येण्याची लोकभावना असल्याचेही पवार यांनी सांगितले.
राज ठाकरेंना गांभीर्याने
घेण्याची गरज नाही
राज ठाकरे यांनी नुकताच हिंदुत्वाचा मुद्दा घेत भगवा झेंडा हाती घेतला आहे. या बदललेल्या भूमिकेवरही शरद पवार यांनी टीका केली. काही लोक भाषण पहायला येतात. काही लोक बघायला येतात. मात्र, त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांची भाषणे म्हणजे करमणूक असल्याचे पवार यांनी नमूद केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी घेतलेली जाहीर भूमिका महाआघाडीला पूरक होती.