वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 05:45 IST2025-10-01T05:45:00+5:302025-10-01T05:45:31+5:30
लडाखला राज्याचा दर्जा द्या, अशी एलएबी व केडीए या दोन्ही संघटनांची मागणी आहे.

वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
लेह : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक व अन्य आंदोलकांची जोवर तुरुंगातून मुक्तता होणार नाही, तसेच लेहमधील मागील आठवड्यात झालेल्या पोलिस गोळीबार प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले जात नाहीत तोवर केंद्राशी चर्चा करणार नाही. या लेह अॅपेक्स बॉडीच्या (एलएबी) निर्णयाला कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सने (केडीए) पाठिंबा दर्शविला.
लडाखला राज्याचा दर्जा द्या, अशी एलएबी व केडीए या दोन्ही संघटनांची मागणी आहे. आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेचा निषेध करून करबलै म्हणाले, काही जण लडाखच्या नागरिकांना देशद्रोही ठरवू पाहत आहेत.
देशद्रोही ठरविण्याचा कट
सोनम वांगचूक व त्यांच्या संस्थांना देशद्रोही ठरविण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप त्यांची पत्नी व हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्हज् लडाख या संस्थेच्या सह-संस्थापक गीतांजली आंगमो यांनी मंगळवारी केला.
संचारबंदी शिथिल केली
लडाखमधील हिंसाग्रस्त लेह शहरात मंगळवारी सकाळी १० वाजेपासून ७तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली. त्यावेळी नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी दुकाने, बाजारपेठांमध्ये झुंबड उडाली.
केंद्र सरकारने लडाखच्या जनतेला फसविले : राहुल
१. केंद्र सरकारने लडाखच्या जनतेची फसवणूक केली आहे. त्या केंद्रशासित प्रदेशात पोलिस गोळीबारात चार आंदोलक मरण पावले. त्या घटनेची न्यायालयीन चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली.
२. लडाखमध्ये गोळीबारात मरण पावलेल्यांमध्ये माजी सैनिक त्सेवांग थारचिन यांचा समावेश आहे. त्सेवांग यांचे वडील लष्करात होते. मात्र, लडाखच्या हक्कांसाठी उभारलेल्या आंदोलनात सहभागी झाल्याने त्सेवांग थारचिन यांना मरण पत्करावे लागले. देशसेवेचे हेच फळ आहे का? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.