नातेवाईक बाहेर करत राहिले विरोध, पोलिसांनी ठाण्यात लावून दिलं लग्न, पोलीसच बनले वऱ्हाडी आणि...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 13:13 IST2025-06-01T13:13:04+5:302025-06-01T13:13:38+5:30

Marriage In Police Station: नातेवाईकांकडून तीव्र विरोध होत असलेल्या एका जोडप्याचं लग्न पोलिसांनीच पुढाकार घेऊन पोलीस ठाण्यात लावून दिल्याची घटना समोर आली आहे. बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील महिला पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे.

Relatives kept protesting outside, police arranged the wedding in the police station, police became the groom and... | नातेवाईक बाहेर करत राहिले विरोध, पोलिसांनी ठाण्यात लावून दिलं लग्न, पोलीसच बनले वऱ्हाडी आणि...  

नातेवाईक बाहेर करत राहिले विरोध, पोलिसांनी ठाण्यात लावून दिलं लग्न, पोलीसच बनले वऱ्हाडी आणि...  

नातेवाईकांकडून तीव्र विरोध होत असलेल्या एका जोडप्याचं लग्न पोलिसांनीच पुढाकार घेऊन पोलीस ठाण्यात लावून दिल्याची घटना समोर आली आहे. बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील महिला पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. नातेवाईकांचा विरोध असतानाही या प्रेमी युगुलानं महिला पोलीस ठाण्यात लग्न केलं. तसेच या लग्न सोहळ्याला महिला पोलीस अधिकारी कनिष्का तिवारी यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आता या अजब विवाह सोहळ्याची एकच चर्चा सुरू आहे. 

बक्सर जिल्ह्यातील सिकरौल पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेंका नावाचा एक गाव आहे. येथील रहिवासी असलेल्या महेंद्र साह यांचा मुलगा पिंटू साह आणि मुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमसारी गावातील शिल्पी कुमारी यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. शिल्पीचं आजोळ असलेल्या रेंका गावामध्ये एका विवाहसोहळ्यात दोघांचीही ओळख झाली होती. तसेच नंतर या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. तसेच या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, जेव्हा या दोघांच्याही नातेवाईकांना या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी याला विरोध केला. तसेच भेटीगाठी घेण्यास मनाई केली. त्यानंतर या जोडप्याने महिला पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच लग्न लावून देण्याची विनंती केली. पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावून पाहिले. मात्र नातेवाईकांनी ऐकलं नाही.

अखेरीस या पोलीस ठाण्यातील मुख्य पोलीस अधिकारी असलेल्या कनिष्का तिवारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंदिरात दोघांचही लग्न लावून दिलं. लग्नानंतर पोलिसांनी नवविवाहित दाम्पत्याला मिठाई भरवली, तसेच आशीर्वाद देऊन त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

मात्र सदर तरुण आणि तरुणीचे नातेवाईक हे अखेरपर्यंत या लग्नाला विरोध करत होते. अखेरीस संतापून तिथून निघून गेले. त्यानंतर पोलिसांनी या प्रेमी युगुलाचं लग्न लावून दिलं.  

Web Title: Relatives kept protesting outside, police arranged the wedding in the police station, police became the groom and...