Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटाचा आत्मघाती हल्लेखोर डॉ. उमर नबीच! कट रचणाऱ्या काश्मिरी आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 09:20 IST2025-11-17T09:17:04+5:302025-11-17T09:20:22+5:30
Red Fort Blast: लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणातील रविवारी राष्ट्रीय तपास संस्थेने आमिर राशिद अली या काश्मीरमधील व्यक्तीला दिल्लीत अटक केली

Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटाचा आत्मघाती हल्लेखोर डॉ. उमर नबीच! कट रचणाऱ्या काश्मिरी आरोपीला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणातील रविवारी राष्ट्रीय तपास संस्थेने आमिर राशिद अली या काश्मीरमधील व्यक्तीला दिल्लीत अटक केली. याच आमिर अलीची कार बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आली होती. तशी नोंदणी त्याच्या नावावर आढळून आली आहे.
आमिर अली हा या प्रकरणातील मुख्य आत्मघाती हल्लेखोर दिल्ली बॉम्बस्फोट डॉ. उमर नबी याच्याबरोबर दहशतवादी हल्ल्याला अंतिम स्वरुप देण्याच्या कटात सामील असल्याचे एनआयएचे म्हणणे आहे. आमिर अली हा जम्मू आणि काश्मीरमधील पंपोर येथील संबुरा या गावाचा रहिवासी आहे. त्याने व डॉ. नबीने मिळून हल्ल्याचा कट रचला होता.
'डॉ. उमर नबी हाच आत्मघाती हल्लेखोर'
डॉ. नबीला कार खरेदी करून देण्याच्या उद्देशाने आमिर दिल्लीत आला होता. त्याने कारमध्ये दुरुस्त्या करून त्यात स्फोटके बसवली होती. रविवारी एनआयएने पहिल्यांदाच डॉ. नबी याला दिल्ली बॉम्बस्फोटाचा मुख्य 'आत्मघाती हल्लेखोर' म्हणून घोषित केले. डॉ. नबी यानेच कार चालवली व त्याने स्फोट घडवून आणला असे एनआयएने स्पष्ट केले आहे. एनआयएने पहिल्यांदाच या कारमध्ये आयईडी होता याची केसमध्ये नोंद केली आहे. या आधी डॉ. नबी हाच कार चालवत होता हे फोरेन्सिक चाचणीतून निष्पन्न झाले आहे. दरम्यान एनआयएने डॉ. नबीचे आणखी एक वाहन जपत केले असून तपासणी सुरू आहे.
७३ प्रत्यक्षदर्शीची करण्यात आली आतापर्यंत चौकशी
गृहखात्याने तपास सोपवल्यानंतर एनआयएने आतापर्यंत ७३ प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली असून दिल्ली, जम्मू-काश्मीर, हरियाणा, उ. प्रदेश पोलिस व अन्य तपास यंत्रणांच्या समन्वयातून एनआयए आपला तपास करत आहे.