"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 09:37 IST2025-11-11T09:35:15+5:302025-11-11T09:37:18+5:30
लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोटात बस कंडक्टर अशोक कुमारचा दुर्दैवी मृत्यू झाला.

"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
Delhi Blast: सोमवारी संध्याकाळी ६:५२ वाजता राजधानी दिल्ली एका शक्तिशाली स्फोटाने हादरली. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे जवळील वाहनांचा चुराडा झाला. या घटनेत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटात उत्तर प्रदेशातील चार जणांचाही मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील मृतांमध्ये अमरोहा जिल्ह्यातील अशोक कुमार नावाचा एक व्यक्ती आहे. अशोक दिल्लीत राहत होता आणि एका वाहतूक कंपनीत बस कंडक्टर म्हणून काम करत होता. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाने अनेक कुटुंबांना कायमचे उद्ध्वस्त केले आहे. या भीषण स्फोटात मृत पावलेल्या आठ जणांपैकी एक असलेले अशोक कुमार (३४) हे उत्तर प्रदेशात अमरोहा जिल्ह्यातील हसनपूरच्या मंगरौला गावचे रहिवासी होते. अशोक कुमार नेहमीप्रमाणे आपली ड्युटी संपवून घरी परतत असताना भीषण स्फोटात त्यांचा मृत्यू झाला. मंगरौला गावात अशोक यांचे वडिलोपार्जित घर आहे. त्यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे वृद्ध आई आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी अशोक यांच्या खांद्यावर होती. कुटुंबाने अजूनही त्यांच्या आईला अशोकच्या मृत्यूची बातमी दिलेली नाही. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने हे सत्य लपवून ठेवण्यात आले आहे.
अशोक यांच्यामागे त्यांची पत्नी आणि तीन लहान मुले – दोन मुली आणि एक मुलगा – आहेत. दिल्लीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबाचा संपूर्ण खर्च अशोक यांच्या नोकरीवर अवलंबून होता. अशोक खूप कष्टाळू होता. ड्युटी संपल्यावर ते रोज कुटुंबासाठी काहीतरी सामान घेऊनच घरी परतत असत. हा अपघात होण्याच्या काही तास आधी, अशोक यांचा घरी फोन आला होता. त्यांनी कुटुंबाला सांगितले होते की, "मी थोड्याच वेळात घरी पोहोचत आहे. मुलांसाठी बिस्किटे आणि दूध घेतले आहे." हा फोन ठेवून काही वेळातच टीव्हीवर दिल्लीत स्फोट झाल्याची बातमी आली.
दिल्ली स्फोटामध्ये अमरोहा येथील व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी टीव्हीवर आल्यानंतर काही वेळातच पोलीस मंगरौला गावात पोहोचले. अशोकचे चुलत भाऊ सोमपाल शर्मा यांनी सांगितले की, पोलिसांनी टीव्हीवरील बातमी आणि मृतांची ओळख पटवल्यानंतर गावात येऊन चौकशी केली. पोलिसांनी अशोकच्या दिल्लीतील राहण्याच्या ठिकाणाची, नोकरीची आणि त्यांच्या मित्रांची माहिती घेतली. स्फोटाच्या दिवशी अशोक कोणत्या मार्गाने आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी पोहोचले, याचीही पोलीस तपास करत आहेत. अशोकच्या भावाने दिल्लीकडे धाव घेतली आहे. दिल्लीत पोस्टमॉर्टम झाल्यानंतर अशोकचे पार्थिव गावात आणण्याची तयारी सुरू आहे.
दरम्यान, अशोक जोपर्यंत हात-पाय चालतात, तोपर्यंत मी सगळ्यांना सांभाळून घेईन, असे वारंवार म्हणायचा. पण अशोकच मृत्यूमुखी पडल्याने दोन कुटुंबांचा आधारस्तंभ हरपला आहे.