टीआरपी चौकशी सीबीआयच्या हाती, उत्तर प्रदेश सरकारची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 07:16 IST2020-10-21T03:29:35+5:302020-10-21T07:16:28+5:30
कमल शर्मा यांनी लखनौतील हजरतगंज पोलीस ठाण्यात टीआरपीबाबत केलेल्या तक्रारीनंतर अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता.

टीआरपी चौकशी सीबीआयच्या हाती, उत्तर प्रदेश सरकारची शिफारस
नवी दिल्ली : टेलिव्हिजन रेटिंग पॉइंटसमधील (टीआरपी) हातचलाखीचे प्रकरण केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी हाती घेतले. टीआरपीबाबत गुन्हा नोंद झाल्यानंतर ही कारवाई झाली. उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या शिफारशीनंतर सीबीआयने लखनौ पोलिसांकडून चौकशी हाती घेतली.
कमल शर्मा यांनी लखनौतील हजरतगंज पोलीस ठाण्यात टीआरपीबाबत केलेल्या तक्रारीनंतर अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. तो आता सीबीआयकडे हस्तांतरीत केला गेला आहे. त्यांच्यावर खोट्या साधनांचा वापर करून टीआरपीची हातचलाखी केल्याचे आरोप आहेत.
टीआरपीचा हा कथित घोटाळा या महिन्याच्या सुरवातीला मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला व त्यांनी गुन्हाही दाखल केला. ज्या चार वाहिन्यांची चौकशी केली जात आहे त्यात रिपब्लिकन टीव्ही एक आहे.
या घोटाळ्याबाबत पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. काही वाहिन्यांना उच्च रेटिंग्ज खात्रीने मिळतील याची निश्चिती होईल, असे प्रयत्न केले गेल्याचे हे प्रकरण आहे.
वाहिन्यांना किती रेटिंग्ज आहेत यावरून जाहिरातदार कोणत्या वेळी जाहिरात द्यायची याचा निर्णय घेतात, त्यामुळे रेटिंग्जला खूप महत्त्व आहे. एआरजी आऊटलायर मिडीया प्रायव्हेट लिमिटेडकडे रिपब्लिक टीव्हीची मालकी असून या टीव्हीचे एडिटर-इन-चीफ अर्णब गोस्वामी यांनी मुंबई पोलिसांनी या वाहिनीवर दाखल केलेला गुन्हा रद्द केला जावा यासाठी गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.