उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 15:08 IST2025-09-04T15:03:50+5:302025-09-04T15:08:00+5:30
Newborn Baby Died After Rat Bite in MP: मध्य प्रदेशातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयामध्ये ही घटना घडली आहे. उंदीर चावल्यामुळे दोन नवजात बाळांचा मृत्यू झाला.

उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
Rat Bite Newborn Baby Died: मध्य प्रदेशातील मोठ्या शासकीय रुग्णालयात दोन नवजात मुलांचा मृत्यू झाला. उंदीर चावल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. इंदूरमधील महाराजा यशवंतराव रुग्णालयात ही घटना घडली आहे.
२४ ऑगस्ट रोजी १० दिवसांच्या एका बाळाला रुग्णालयातच ठेवून कुटुंबीय घरी गेले होते. लहान बाळांसाठी सर्वात सुरक्षित असलेल्या या रुग्णालयात ३१ ऑगस्ट रोजी बाळाला उंदीर चावले. २ सप्टेंबर रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अशाच पद्धतीने आणखी एका लहान बाळाचा ३ सप्टेंबर रोजी दुपारी मृत्यू झाला. या प्रकारवर रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणाले की, दोन्ही बाळाचा मृत्यू वेगवेगळ्या आजारांमुळे झाला आहे. पण, राज्याच्या वैद्यकीय विभागाच्या आयुक्तांनी रुग्णालयाला नोटीस बजावत उत्तर मागितले आहे.
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक यादव म्हणाले की, ही एक दुर्दैवी घटना आहे. संवेदनशील घटना आहे. पण, बाळांचा मृत्यू उंदीर चावल्यामुळे झालेला नाही, तर ते जन्मजात आजारामुळे मरण पावले आहेत.
बाळांच्या शरीरावर उंदीर चावल्याच्या खुणा
दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने असेही म्हटले आहे की, बाळांच्या डोक्याला उंदीर चावले असल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. या प्रकरणी दोन परिचारिकांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर काही अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे.
रुग्णालयात उंदरांचा सूळसुळाट
डॉ. अशोक यादव यांनी सांगितले की, 1994 मध्ये या रुग्णालयात उंदीर मारण्याची मोहीम राबवली गेली होती. त्यावेळी रुग्णालय १० दिवसांसाठी रिकामे करण्यात आले होते. पेस्ट कंट्रोल करून १२ हजार उंदीर मारण्यात आले होते.२०१४ मध्येही पेस्ट कंट्रोल करून अडीच हजार उंदीर मारण्यात आले होते.