केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची क्रूरपणे हत्या, पत्नीसोबत जात असताना वाटेत रोखले, शरीरावर ५० वार केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 14:40 IST2021-11-15T14:10:06+5:302021-11-15T14:40:42+5:30
RSS worker Murdered In Kerala: केरळमधील पल्लकड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकाची आज क्रूरपणे हत्या करण्यात आली. आज सकाळी संघाचे स्वयंसेकवक असलेले S Sanjith हे कुटुंबीयांसोबत जात असताना त्यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.

केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची क्रूरपणे हत्या, पत्नीसोबत जात असताना वाटेत रोखले, शरीरावर ५० वार केले
तिरुवनंतपुरम - केरळमधील पल्लकड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकाची आज क्रूरपणे हत्या करण्यात आली. आज सकाळी संघाचे स्वयंसेकवक असलेले एस. संजित हे कुटुंबीयांसोबत जात असताना त्यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांना संजित यांना अडवून त्यांच्यावर धारदार हत्याराने ५० हून अधिक वार केले आणि पळून गेले. या घटनेनंतर संजित यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
एनआयने दिलेल्या वृत्तानुसार संघाचे स्वयंसेवक असलेले २७ वर्षीय एस. संजित हे त्यांच्या पत्नीसोबत सकाळी कुठेतरी जात होते. त्याचवेळी वाटेत काही हल्लेखोरांनी त्यांना रोखले. तसेच त्यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. त्यानंतर हे हल्लेखोर संजित यांना तिथेच सोडून पसार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संजित यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. तसेच पोलिसांनी बंदोबस्तही कडेकोट ठेवला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष के.एम. हरिदास यांनी या हत्येसाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाला जबाबदार धरले आहे. ही संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआयची राजकीय शाखा आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वंयसेवकाची हत्या होण्याची केरळमधील ही काही पहिली घटना नाही. यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात संघाच्या एका स्वयंसेवकाची हत्या करण्यात आली होती. त्याविरोधात संघ आणि भाजपाने राज्यात बंदचे आवाहन केले होते. त्यावेळी चोर्थलाजवळील नगमकुलनगरा परिसरात संघ आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्यात झालेल्या झटापटीमध्ये संघ स्वयंसेवक नंदू याचा मृत्यू झाला होता.