‘राष्ट्रमंच’ केंद्र सरकारला दिशा देण्याचे काम करणार; शरद पवार यांच्या घरातील बैठकीत निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 07:23 AM2021-06-23T07:23:53+5:302021-06-23T07:24:28+5:30

आजारातून बरे झाल्यावर बराच कालावधीनंतर शरद पवार दोन दिवसांपूर्वी दिल्लीत आले.

‘Rashtramanch’ will work to give direction to the central government; Decision in NCP President Sharad Pawar's house meeting | ‘राष्ट्रमंच’ केंद्र सरकारला दिशा देण्याचे काम करणार; शरद पवार यांच्या घरातील बैठकीत निर्णय 

‘राष्ट्रमंच’ केंद्र सरकारला दिशा देण्याचे काम करणार; शरद पवार यांच्या घरातील बैठकीत निर्णय 

googlenewsNext

- विकास झाडे

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील घरातच विविध पक्षांच्या नेत्यांची बैठक असल्याने यानंतर देशात कोणत्या राजकीय घडामोडी होऊ शकतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु तसे काहीही घडले नाही. ही बैठक राष्ट्रमंचची होती. शरद पवार फक्त या बैठकीचे आयोजक होते असे स्पष्ट झाले. देशात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, परंतु ते सोडवण्याचे  व्हिजन सरकारकडे नाही. सरकारला ते व्हिजन देण्याचे काम राष्ट्रमंच करणार असल्याचे बैठकीतून समोर आले आहे.

आजारातून बरे झाल्यावर बराच कालावधीनंतर शरद पवार दोन दिवसांपूर्वी दिल्लीत आले. मुंबईत प्रशांत किशोर यांनी त्यांची भेट घेतल्याने पवार दिल्लीत आल्यानंतर कोणकोणत्या राजकीय घडामोडी होतात यावर उलटसुलट चर्चा सुरू होत्या. सोमवारी प्रशांत किशोर आणि पवारांची दुसरी बैठक झाल्याने मोदींना शह देण्यासाठी पवारांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी होऊ शकते, अशा शक्यता वर्तवण्यात आल्या.  पवारांच्या निवासस्थानी मंगळवारी १५ पक्षातील नेत्यांची बैठक झाली, त्यात काही सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. जवळपास अडीच तास विचारमंथन झाले. या बैठकीला जे नेते येणे अपेक्षित होते त्यातील बरेच महत्वाचे गैरहजर होते. काँग्रेसचा एकही प्रतिनिधी यावेळी उपस्थित नव्हता. 

चांगले वातावरण निर्माण करण्याबाबत चर्चा - माजिद मेमन 

बैठकीनंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अ‍ॅड. माजिद मेमन यांनी खुलासा केला. ते म्हणाले, गेले २४ तास माध्यमांनी या बैठकीबाबत तिसऱ्या आघाडीचे संकेत देत जे काही रंजन करुन सांगितले तशातला कुठलाही प्रकार नव्हता. माजी मंत्री यशवंत सिन्हा यांच्या ‘राष्ट्रमंच’तर्फे या बैठकीचे आयोजन होते. आम्ही समविचारी आहोत. चांगले राजकीय वातावरण निर्माण कसे होईल याबाबत चर्चा झाली. ही बैठक भाजपविरोधी नव्हती आणि कॉँग्रेसला वगळूनही नव्हती. 

काँग्रेसच्या कपिल सिब्बल, शत्रुघ्न सिन्हा आणि अभिषेक मनू  सिंघवी यांनाही राष्ट्रमंचतर्फे  निमंत्रण दिले होते. परंतु ते अन्य  कामात व्यस्त असल्याने उपस्थित राहू शकले नाही. अर्थकारण, बेरोजगारी, महागाई, इंधन दरवाढ यावर राष्ट्रमंच आवाज उठणार असल्याचे समाजवादी पार्टीचे घनश्याम तिवारी यांनी स्पष्ट केले. पवारांनी माध्यमांसमोर येणे टाळले  बैठकीनंतर पवारांनी माध्यमांसमोर येणे टाळले. ज्यांच्या मंचतर्फे बैठक होती ते यशवंत सिन्हा प्रास्ताविक करून एका मिनिटातच पत्रकार परिषदेतून निघून गेले. त्यामुळे या बैठकीत नेमके शिजले तरी काय? याबाबत चर्चा कायम होती.

यांचीही उपस्थिती

या बैठकीत शरद पवार, यशवंत सिन्हा, जावेद अख्तर, प्रीतिश नंदी, अरुण शौरी, ओमर अब्दुल्ला, आम आदमी पार्टीचे सुशील गुप्ता, आरएलडीचे जयंत चौधरी, सपाकडून घनश्याम तिवारी, पवन वर्मा, के. सी. सिंग, माजीद मेमन, प्रफुल्ल पटेल, वंदना चव्हाण, जस्टीस ए. पी. शाह आदींची उपस्थिती होती.

Web Title: ‘Rashtramanch’ will work to give direction to the central government; Decision in NCP President Sharad Pawar's house meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.