'मी निर्दोष, मला गोवले जात आहे', सोन्याच्या तस्करीत अडकलेल्या रन्या रावचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 14:57 IST2025-03-09T14:56:23+5:302025-03-09T14:57:02+5:30
Ranya Rao Gold Smuggling Case: अभिनेत्री रन्या रावला कोट्यवधी रुपयांच्या सोन्यासह बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आले.

'मी निर्दोष, मला गोवले जात आहे', सोन्याच्या तस्करीत अडकलेल्या रन्या रावचा मोठा दावा
Ranya Rao Gold Smuggling Case : कन्नड अभिनेत्री रन्या राव हिला काही दिवसांपूर्वीच बंगळुरू विमानतळावर सोन्याची तस्करी करताना रंगेहात पकडले. तिने दुबईहून तब्बल 12.56 कोटींचे सोने भारतात आणले होते. यानंतर रेव्हेन्यू इंटेलिजेंस डायरेक्टरेट (डीआरआय) च्या अधिकाऱ्यांनी रन्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यादरम्यान रन्या ढसाढसा रडली आणि आपण निर्दोष असल्याचा दावा केला.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, चौकशीत रन्याने तस्करीचा आरोप फेटाळला असून, या प्रकरणात फसवल्याचा दावाही केला आहे. शुक्रवारी (7 मार्च, 2025) न्यायालयात हजर केले जात असता रन्या राव तिच्या वकिलांना म्हणाली, मी यात का अडकले, याचेच मला आश्चर्य वाटते. मला झोप येत नाही, मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. मला या प्रकरणात अडवले जात आहे. मात्र, रन्याचा हा दावा डीआरआयला दिलेल्या तिच्या अधिकृत जबाबाच्या पूर्ण विरोधात आहे. अधिकाऱ्यांसमोर तिने 17 सोन्याची बिस्कीटे भारतात आणल्याची कबुली दिली आहे.
युरोप, अमेरिका आणि मिडल इस्टलाही गेली
दरम्यान, तपासात असे समोर आले आहे की, रन्या राव फक्त दुबईच नाही, तर युरोप, अमेरिका आणि मध्यपूर्वेलाही गेली होती. आता अधिकारी त्या सर्व दौऱ्यांचाही तपास करत आहेत. रन्याने इतर देशांमधून तस्करी केली का? तिला यात कोण मदत करत होते? हे नेटवर्क किती मोठे आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरेही अधिकारी शोधत आहेत.
हे प्रकरण चेन्नईसारखेच आहे
हे प्रकरण गेल्या वर्षी चेन्नईमध्ये घडलेल्या एका घटनेसारखे दिसते. त्यात केरळमधील एका सॉफ्टवेअर कर्मचाऱ्याच्या पत्नीला दुबईतून 12 किलो सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले होते. सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या एका मित्राने तिला ब्लॅकमेल केल्याचे नंतर तपासात उघड झाले. रन्या रावच्या निकटवर्तीयांनी तिला या कामात ढकलले असावे, असाही अधिकाऱ्यांना संशय आहे.
काय आहे प्रकरण?
रन्या रावला सोमवारी बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 12 कोटी रुपयांच्या सोन्याच्या बिस्टीटांसह अटक करण्यात आली. तिने हे सोने दुबईहून आणल्याचे तपासात समोर आहे. विशेष म्हणजे, तिने यापूर्वीही अनेकदा दुबईहुन सोने तस्करी केल्याचे समोर आले आहे. सध्या रन्या रावला 10 मार्चपर्यंत डीआरआय कोठडीत पाठवण्यात आले असून, अधिकाऱ्यांनी तिच्या घरातून कोट्यवधी रुपयांची रोकड आणि दागिनेही जप्त केले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.