Ranya Rao : "मला खूप शिवीगाळ केली, धमकावलं"; न्यायालयात रडली रान्या राव, केला मानसिक छळाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 17:42 IST2025-03-10T17:42:11+5:302025-03-10T17:42:54+5:30
Ranya Rao : कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं.

Ranya Rao : "मला खूप शिवीगाळ केली, धमकावलं"; न्यायालयात रडली रान्या राव, केला मानसिक छळाचा आरोप
सोन्याची तस्करी करताना बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयीन सुनावणीदरम्यान, रान्याने महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांवर मानसिक छळ आणि गैरवर्तनाचा आरोप केला. याच दरम्यान ती न्यायालयात ढसाढसा रडली. मात्र अधिकाऱ्यांनी तिचे आरोप फेटाळून लावले आहेत आणि अभिनेत्री तपासात सहकार्य करत नसल्याचं म्हटलं आहे.
अटक झाल्यानंतर अभिनेत्रीला शुक्रवारी आर्थिक गुन्ह्यांच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथे तिला २४ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने रान्याला अनेक प्रश्न विचारले. न्यायालयाने अभिनेत्रीला विचारलं की तिला काही त्रास झाला का? यावर अभिनेत्री न्यायालयातच रडू लागली आणि डीआरआय अधिकाऱ्यांवर मानसिक छळाचा गंभीर आरोप केला.
"मी उत्तर दिलं नाही तर ते मला धमकावतात"
न्यायालयाने यानंतर रान्याला विचारलं की, तिला वैद्यकीय उपचार मिळाले का? या प्रश्नाचे उत्तर देताना, अभिनेत्रीने दावा केला की, तिला मानसिक छळाचा सामना करावा लागला आहे. "जर मी उत्तर दिलं नाही तर ते मला धमकी देतात आणि म्हणतात, तू बोलली नाहीस तर काय होईल हे तुला माहिती आहे" असंही अभिनेत्रीने सांगितलं. तसेच "त्यांनी मला मारलं नाही, पण मला खूप शिवीगाळ केली. यामुळे मला खूप मानसिक त्रास झाला आहे" असं सांगितलं.
तपासात सहकार्य न करण्याचा आरोप
अभिनेत्री न्यायालयात हजर असताना सहाहून अधिक डीआरआय अधिकारी उपस्थित होते. त्यांनी रान्याचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत आणि तिच्यावर प्रश्नांची उत्तरं न देण्याचा आणि तपासात सहकार्य न करण्याचा आरोप केला आहे. "चौकशीदरम्यान तिने कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देण्यास नकार दिला आहे. आम्ही जेव्हा जेव्हा विचारतो तेव्हा ती गप्प राहते. आम्ही संपूर्ण चौकशी रेकॉर्ड केली आहे" असं अधिकाऱ्याने म्हटलं आहे.