rampur another jolt for azam khan yogi government stops loktantra senani pension | योगी सरकारचा आझम खान यांना मोठा दणका, महिन्याला मिळणारं 20 हजारांचं पेन्शन केलं बंद

योगी सरकारचा आझम खान यांना मोठा दणका, महिन्याला मिळणारं 20 हजारांचं पेन्शन केलं बंद

नवी दिल्ली - विविध वाद आणि आरोपांमध्ये कायम चर्चेत असणारे समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) नेते आणि रामपूरचे खासदार आझम खान यांना योगी सरकारने मोठा धक्का दिला आहे. सरकारने आझम खान (Azam Khan) यांना लोकतंत्र सेनानी (Loktantra Senani Pension) म्हणून मिळणारं पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पेन्शन म्हणून आझम खान यांना दर महिन्याला 20 हजार रुपये देण्यात येत होते. भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या कालावधीमध्ये तुरुंगवास झालेल्या नेत्यांना ‘लोकतंत्र सेनेनी’ असा दर्जा देऊन त्यांना मासिक पेन्शन दिलं जात होतं. मात्र आता योगी सरकारच्या निर्णयामुळे आझम खान यांना यापुढे हे पेन्शन मिळणार नाही.

2005 मध्ये तत्कालीन मुलायम सरकारने आझम खान यांना लोकतंत्र सेनेनी म्हणून घोषित करत पेन्शन सुरू केलं होतं. सुरुवातीला या पेन्शनची रक्कम 500 रुपये इतकी होती. नंतर ही रक्कम थेट प्रति महिना 20 हजार रुपये इतकी करण्यात आली. अनेक प्रकरणांमध्ये आझम खान यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने योगी सरकारने अपराधी पार्श्वभूमीचे कारण देत हे पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

देशामध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली त्यावेळी आझम खान हे अलीगड मुस्लीम युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी संघटनेचे नेते होते. आणीबाणीच्या काळात आझम खान यांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. जेव्हापासून आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन सुरू करण्यात आलं आहे तेव्हापासून आझम खान याचा लाभ घेत होते. बुधवारी रामपूर जिल्हा प्रशासनाने लोकतंत्र सेनानींची यादी जाहीर केली तेव्हा त्यामध्ये 35 जणांच्या नावांचा समावेश होता. यापूर्वी ही यादी 37 जणांची होती. आझम खान यांना या नव्या यादीतून वगळण्यात आलं आहे.

रामपूरचे जिल्हा न्यायदंडाधिकारी आंजनेय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार आझम खान यांच्याविरोधात दाखल असणाऱ्या गुन्ह्यांची संख्या आणि गांभीर्य लक्षात घेता त्यांचं पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी यासंदर्भातील माहिती आणि अहवाल राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाकडून मागवला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील एका चर्चेदरम्यान अजब विधान केले आहे. या विधानावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. 

हज यात्रेला जाणारा भारतीय हिंदू म्हणूनच ओळखला जातो: योगी आदित्यनाथ

हज यात्रेला जाणारा भारतीय हिंदू म्हणून ओळखला जातो, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. अखंड भारतातील कोणताही नागरिक जेव्हा हज किंवा अन्य कारणांसाठी परदेशात जातो. तेव्हा त्याला हिंदू म्हणूनच ओळखले जाते, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. हिंदू हा धर्म नाही. हिंदू एक जीवन पद्धती आहे. ती एक संस्कृती आहे. सनातन हा धर्म आहे. आम्हाला आमच्या हिंदू म्हणून असलेल्या ओळखीबाबत अभिमान वाटतो, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. हिंदूला जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न करणारे लोक अयोध्या, मथुरा, काशी यांचा आदर करत नाहीत. हिंदू शब्दाचा एवढा राग कशासाठी केला जातो, असा प्रश्न उपस्थित करत हिंदू म्हणजे कोणताही एक धर्म नाही. सनातन हा धर्म आहे, असे योगी म्हणाले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rampur another jolt for azam khan yogi government stops loktantra senani pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.