राम रहीम सहा महिन्यात दुसऱ्यांदा पॅरोलवर; पुन्हा २१ दिवसांसाठी आला बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 13:54 IST2025-04-09T13:50:21+5:302025-04-09T13:54:55+5:30
लैंगिक अत्याचार प्रकरणात तुरुंगात असलेला राम रहीम सहा महिन्यात पुन्हा एकदा पॅरोलवर आला आहे.

राम रहीम सहा महिन्यात दुसऱ्यांदा पॅरोलवर; पुन्हा २१ दिवसांसाठी आला बाहेर
लैंगिक अत्याचार प्रकरणात तुरुंगात असलेला राम रहीम सहा महिन्यात दुसऱ्यांदा पॅरोलवर आला आहे. हरयाणा सरकारने राम रहीमवर दया दाखवली आहे. त्याला २१ दिवसांची रजा दिली आहे. आज सकाळी, राम रहीमला कडक सुरक्षेत सुनारिया तुरुंगातून सिरसा येथील डेरा मुख्यालयात पाठवण्यात आले.
राम रहीमच्या स्वागतासाठी हनीप्रीत तुरुंगात पोहोचली होती. राम रहीमच्या पॅरोलमुळे त्याच्या अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याला तुरुंगातून बाहेर सोडत असताना मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वक्फ विधेयकावरून जम्मू काश्मीर विधानभवनात फ्री स्टाईल हाणामारी; भाजपा-AAP आमदार भिडले
२९ एप्रिल रोजी डेरा सच्चा सौदाचा वर्धापन दिन आहे. दरवर्षीप्रमाणे, यावेळीही राम रहीमवर प्रवचन देण्यावर किंवा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी कायम राहील. यापूर्वी, दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी, राम रहीमला ३० दिवसांचा पॅरोल देण्यात आला होता.
राम रहीमला २० वर्षांची शिक्षा
२०१७ पासून तुरुंगात असलेल्या राम रहीमला अनेक वेळा फर्लो आणि पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. २०२० पासून, सुमारे ३०० दिवसांचा पॅरोल आणि रजा मंजूर करण्यात आली आहे. हरयाणा निवडणुकीपूर्वीच राम रहीम तुरुंगातून बाहेर आला होता. राम रहीमला त्याच्या दोन शिष्यांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर न्यायालयाने २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याशिवाय, पत्रकाराच्या हत्येप्रकरणी दोषी आढळल्यानंतर न्यायालयाने राम रहीमसह ४ जणांना १६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.