अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 08:19 IST2025-05-22T08:19:04+5:302025-05-22T08:19:04+5:30
मिश्रा यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठा सोहळा ५ जून रोजी होईल व तो खूपच भव्य होण्याची अपेक्षा आहे. परंतु यावेळी अतिथींची यादी वेगळी असू शकते. मागील वर्षी २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एका समारंभात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.

अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा
नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम ५ जूनपर्यंत पूर्ण होत असून, ३ जूनपासून सुरू होणाऱ्या सोहळ्यात राम दरबारची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे, असे श्री राम जन्मभूमी निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले आहे.
मिश्रा यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठा सोहळा ५ जून रोजी होईल व तो खूपच भव्य होण्याची अपेक्षा आहे. परंतु यावेळी अतिथींची यादी वेगळी असू शकते. मागील वर्षी २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एका समारंभात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.
राम दरबारच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ५ जूनला होईल. अनुष्ठान ३ जून रोजी सुरू होईल. त्याबरोबरच परिसरात अन्य सात मंदिर उभारण्यात आले आहेत. त्या मंदिरांसाठीही धार्मिक अनुष्ठान त्याच दिवशी सुरू होईल. मंदिराचे निर्माणकार्य ५ जूनपर्यंत पूर्ण होईल. त्याचबरोबर भगवान श्रीराम यांची कथा दर्शवणारे भित्तिचित्रे मंदिराच्या खालच्या भागात लावली जाणार आहेत.
कोण असतील उपस्थित
५ जूनचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मागील वर्षीप्रमाणेच भव्य होणार का, असे विचारले असता, श्री राम जन्मभूमी निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, मंदिर ट्रस्ट याची अंतिम रूपरेषा तयार करीत आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा नेहमीच भव्य होतो. परंतु यावेळी अतिथींची यादी वेगळी असू शकते.
पूजा करणारे पुजारी वेगळे असू शकतात. अतिथींच्या यादीत राज्य किंवा केंद्रातील विशिष्ट लोक सहभागी नसतील, असेही ते म्हणाले. विविध धर्मांच्या आध्यात्मिक गुरूंना सोहळ्यासाठी बोलावण्याचा विचार सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.