मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 15:17 IST2025-08-09T15:17:01+5:302025-08-09T15:17:37+5:30
किरणभाई पटेल यांच्या आयुष्यात रक्षाबंधनाचा सण खूप खास आहे. दोन वर्षांपूर्वी किडनी फेल झाल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात होता.

फोटो - आजतक
गांधीनगरच्या किरणभाई पटेल यांच्या आयुष्यात रक्षाबंधनाचा सण खूप खास आहे. दोन वर्षांपूर्वी किडनी फेल झाल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात होता. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, किडनी ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय आहे. त्यावेळी संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. मुलगा आणि मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये राहत होती आणि पत्नी देवाकडे प्रार्थना करत होती. या कठीण काळात किरणभाईंच्या चार मोठ्या बहिणी त्यांच्यासाठी सुरक्षा कवच म्हणून उभ्या होत्या.
किरणभाई डायलिसिसवर होते आणि किडनी ट्रान्सप्लांटची वाट पाहत होते. बहिणींना ही बातमी कळताच सर्वांनी किडनी डोनेट करण्याची इच्छा व्यक्त केली. मोठी बहीण कॅनडाहून भारतात आली, परंतु वय आणि ब्लड प्रेशरच्या समस्येमुळे डॉक्टरांनी नकार दिला. तर बाकीच्या बहिणींना प्रकृतीविषयक समस्या असल्याने किडनी देता येऊ शकत नव्हती.
अखेर दुसऱ्या नंबरची बहीण सुशीलाबेनची किडनी मॅच झाली आणि ऑपरेशनचा निर्णय तात्काळ घेण्यात आला. किरणभाई म्हणतात की, माझे भावोजी भूपेंद्रभाई नेहमीच माझ्या बहिणीसोबत येत असत, आम्हाला प्रोत्साहन देत असत. त्यांच्या पाठिंब्यामुळेच माझ्या बहिणीने मला तिची किडनी दिली. सुशीलाबेन यांनी माझ्या सासरच्यांसह माझ्या संपूर्ण कुटुंबाने मला पाठिंबा दिल्याचं म्हटलं.
अहमदाबादच्या सरकारी किडनी हॉस्पिटल (IKDRC) मध्ये यशस्वी ऑपरेशननंतर, किरणभाई गेल्या दीड वर्षांपासून निरोगी जीवन जगत आहेत. गेल्या तीन वर्षांत सुमारे २० बहिणींनी त्यांच्या भावांना किडनी दान केली आहे आणि ३ भावांनी या रुग्णालयात त्यांच्या बहिणींना किडनी दान केली आहे. हे केवळ अवयवदानाचं उदाहरण नाही तर भावा-बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेम आहे.