राज्यसभेच्या पाचव्या जागेवर तिढा; भाजपसह विरोधकांनाही AIMIM ची गरज, ओवेसी कुणाच्या बाजूने?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:06 IST2026-02-24T15:05:18+5:302026-02-24T15:06:28+5:30
AIMIM चे 5 आमदार; पाचव्या जागेसाठी एनडीएला तीन आमदारांच्या पाठिंब्याची गरज!

राज्यसभेच्या पाचव्या जागेवर तिढा; भाजपसह विरोधकांनाही AIMIM ची गरज, ओवेसी कुणाच्या बाजूने?
Rajya Sabha Elections 2026: बिहारमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी लवकरच निवडणूक होणार असून, चार जागांचे गणित जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र पाचव्या जागेवरच खरी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. या जागेसाठी सत्ताधारी एनडीए आणि विरोधकांसाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) आणि बहुजन समाज पार्टी (BSP) यांच्या आमदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
विजयासाठी 41 मतांची आवश्यकता
बिहार विधानसभेत सध्या 243 जागा आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी उमेदवाराला किमान 41 मतांची गरज आहे. सध्याच्या संख्याबळानुसार, एनडीएकडे एकूण 202 आमदारांचे समर्थन असल्याने चार जागांवर त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. पाचव्या जागेसाठी मात्र एनडीएला केवळ तीन अतिरिक्त आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.
जेडीयू व भाजपसाठी जागा जवळपास निश्चित
मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) साठी पाचपैकी दोन जागा निश्चित मानल्या जात आहेत. तर, भारतीय जनता पक्ष स्वतःकडे दोन जागा ठेवणार आहे. पाचव्या जागेसाठी भाजप आपल्या एखाद्या सहयोगी पक्षाच्या उमेदवाराला पुढे करू शकते. अशा परिस्थितीत भाजपसारख्या मोठ्या पक्षालाही एआयएमआयएमसारख्या छोट्या पक्षावर अवलंबून राहावे लागणार आहे.
पाचव्या जागेवरच अडचण
राष्ट्रीय जनता दल (RJD) यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनकडे सध्या 35 आमदार आहेत. राज्यसभेत किमान एक प्रतिनिधी पाठवण्यासाठी महागठबंधनला आणखी सहा आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. याच ठिकाणी एआयएमआयएमचे पाच आमदार आणि बीएसपीचा एकमेव आमदार, हे दोन्ही आघाड्यांसाठी ‘किंगमेकर’ ठरू शकतात.
महागठबंधनमधील पक्षीय बलाबल
आरजेडी: 25 आमदार
काँग्रेस: 6 आमदार
सीपीआय (एमएल) (एल): 2 आमदार
सीपीएम: 1 आमदार
इंडियन इन्क्लूसिव पार्टी (IIP): 1 आमदार
एआयएमआयएमने केली एका जागेची मागणी
बिहार एआयएमआयएमचे अध्यक्ष अख्तरुल ईमान यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, महागठबंधनने समजदारीने पावले उचलली, तर ते एक राज्यसभा जागा जिंकू शकतात. यावेळी एआयएमआयएमला संधी द्यावी, कारण अद्याप आमचा उच्च सभागृहात कोणताही प्रतिनिधी नाही. तुमची विचारधारा आमचीही आहे. आम्ही पाठिंब्याची मागणी करत आहोत.
हिना शहाब यांच्या नावाची चर्चा
एआयएमआयएमला जवळ करण्यासाठी आरजेडीचे आमदार भाई वीरेंद्र यांनी एक प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे की, माजी खासदार शहाबुद्दीन यांच्या पत्नी हिना शहाब यांना आरजेडीकडून राज्यसभेची संधी दिली जावी. मुस्लिम उमेदवार दिल्यास एआयएमआयएमला आक्षेप राहणार नाही आणि आमदारांचा पाठिंबा मिळू शकतो, असा त्यामागचा युक्तिवाद आहे.
पाचवी जागा चर्चेत...
एकूणच, बिहारमधील राज्यसभा निवडणुकीतील पाचवी जागा सध्या सर्वाधिक चर्चेत असून, येत्या काळात एआयएमआयएम आणि बीएसपी कोणाच्या बाजूने झुकतात, यावर संपूर्ण राजकीय गणित अवलंबून असणार आहे.