हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारल्याने आणि त्याची गृहमंत्रालयाने अधिसूचना जारी केल्याने नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी वातावरणनिर्मिती झाली आहे. या पदासाठी सूत्रांनी सांगितले की, राजनाथसिंह हे सर्वांना पसंतीस उतरणारे नाव आहे. २०२२ मध्येही उपराष्ट्रपती निवडणुकीदरम्यान त्यांचे नाव चर्चेत होते. मोदी सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे अतिशय महत्त्वाचे नेते असे स्थान असलेल्या राजनाथ सिंह यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही समर्थन आहे. सर्व पक्षांमध्ये त्यांना आदराचे स्थान आहे.
निवडणूक आयोग कधी निवडणूक घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी संभाव्य उमेदवारांबाबत चाचपणी सुरू झाली असून, त्याबाबतच्या चर्चांनाही उधाण आले आहे. मात्र, या पदासाठीच्या शर्यतीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. ही माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायणसिंह यांचे नावही उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. मात्र, सध्याची राजकीय स्थिती पाहता त्यांची या पदावर निवड होण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही नावे चर्चेत आहेत; परंतु त्याविषयी अजून कोणतीही खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही.जगदीप धनखड यांनी आरोग्याचे कारणे देत उपराष्ट्रपतीपदाचा सोमवारी अचानक राजीनामा देऊन तो तत्काळ स्वीकारण्याची राष्ट्रपतींना विनंती केली. राज्यघटनेनुसार, उपराष्ट्रपतीपद रिक्त झाल्यानंतर “लवकरात लवकर” निवडणूक होणे आवश्यक आहे, मात्र प्रचलित संकेतांनुसार ही निवडणूक ६० दिवसांच्या आत घेणे अपेक्षित आहे. २०२२ मध्ये ही निवडणूक नामनिर्देशनाच्या तारखेपासून (५ जुलै) अवघ्या ३१ दिवसांत, म्हणजेच ६ ऑगस्ट रोजी मतदान होऊन पार पडली होती. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक तत्काळ घ्यायची असल्यास संसदेचे सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेशन २१ ऑगस्टनंतर काही दिवसांसाठी वाढवावे लागेल, जेणेकरून दोन्ही सभागृहांचे सदस्य मतदान करू शकतील.घटक पक्षांच्या सहमतीनंतर ठरणार एनडीएचा उमेदवार लोकसभा, राज्यसभेतील ७८६ खासदारांपैकी ६ जागा रिक्त असून, दोन्ही सभागृहांत भाजपला स्वबळावर बहुमत नाही. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडताना भाजपला एनडीएच्या घटक पक्षांची सहमती मिळणे आवश्यक आहे. त्या उमेदवाराला विजयासाठी ३९४ मतांची आवश्यकता असेल. यासाठी भाजपला आपल्या मित्रपक्षांशी नीट चर्चा करून या निवडणुकीची रणनीती ठरवावी लागेल. भाजपप्रणीत एनडीएला लोकसभेत ५४२ पैकी २९३ जणांचा आणि राज्यसभेत १२९ खासदारांचा पाठिंबा असून, ही आघाडी मजबूत स्थितीत आहे. २४५ सदस्यीय राज्यसभेत सध्या पाच जागा रिक्त आहेत. नामनिर्देशित खासदारांनाही उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क आहे.