चिंताजनक! मोबाईलच्या अतिवेडानं तरुण बनला मनोरुग्ण; कुटुंबाला ओळखेना, काहीच खाईना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 16:55 IST2021-11-29T16:55:15+5:302021-11-29T16:55:38+5:30
पाच दिवसांपासून झोप नाही; मोबाईलच्या वेडानं अन्नपाणी सोडलं

चिंताजनक! मोबाईलच्या अतिवेडानं तरुण बनला मनोरुग्ण; कुटुंबाला ओळखेना, काहीच खाईना
जयपूर: राजस्थानच्या चुरु जिल्ह्यातील साहवामध्ये वास्तव्यास असलेल्या एका २० वर्षीय तरुणाला मोबाईलचं प्रचंड व्यसन लागलं आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे तो मानसिक रुग्ण झाला आहे. तरुण त्याच्या कुटुंबातील सदस्यांनादेखील ओळखत नाही. तो कोणाशाही बोलत नाही. गेल्या महिन्याभरापासून कामधंदा सोडून केवळ मोबाईल वापरणारा तरुण ५ दिवस झोपूही शकलेला नाही.
तरुणाची प्रकृती जास्त बिघडल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक त्याला चुरुमधील राजकीय भरतिया रुग्णालयातल्या एमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन गेले. तिथे मानसोपचारतज्ज्ञांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक रुग्ण झालेल्या तरुणाचं नाव अक्रम असून तो विजेच्या मोटार वाईडिंगचं काम करतो.
गेल्या महिन्याभरातील अधिक वेळ अक्रमनं मोबाईलवर घालवला. मोबाईलवर वेळ घालवायचा असल्यानं त्यानं कामही सोडलं. कुटुंबियांनी, नातेवाईकांनी वारंवार सांगूनही त्यानं मोबाईल सोडला नाही. गेल्या काही दिवसांपासून तो संपूर्ण रात्र मोबाईलवर गेम खेळत होता, चॅटिंग करत होता. त्यामुळे त्यानं खाणंपिणंही सोडलं.
अक्रम काहीच खात नसल्याची माहिती त्याच्या आईनं दिली. रात्री त्याला खायला दिल्यावर तो सर्व अन्न बेडवर टाकून देतो. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जितेंद्र कुमार अक्रमवर उपचार करत आहेत. त्यांनी अक्रमचं सीटी स्कॅन केलं असून पुढील उपचार सुरू आहेत.