उघड्यावर लघुशंका करताना आढळले राजस्थानचे मंत्री, टीका झाल्यावर म्हणाले ही तर जुनी परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 15:04 IST2018-10-08T15:04:18+5:302018-10-08T15:04:58+5:30
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही भूमिका घेत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेतेमंडळी या अभियानाचा बोऱ्या वाजवताना दिसत आहेत.

उघड्यावर लघुशंका करताना आढळले राजस्थानचे मंत्री, टीका झाल्यावर म्हणाले ही तर जुनी परंपरा
अजमेर - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही भूमिका घेत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेतेमंडळी या अभियानाचा बोऱ्या वाजवताना दिसत आहेत. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सरकारमध्ये मंत्री असलेले शंभू सिंह यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या छायाचित्रामध्ये ते उघड्यावर लघुशंका करताना दिसत आहे.
शंभू सिंह यांचे हे छायाचित्र व्हायरल झाल्यापासून त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. त्यामाध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पण या प्रकाराचा कुठलाही खेद वा खंत नसलेल्या या मंत्रिमहोदयांनी मात्र उघड्यावर लघुशंका करणे ही आपली जुनी परंपरा आहे, असे सांगत आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.
हे छायाचित्र अजमेरमधील ज्या ठिकाणावरून काढण्यात आले त्याच्या जवळच भाजपाने एका सभेचे आयोजन केले होते. दरम्यान, हे छायाचित्र व्हायरल झाल्यापासून केंद्र आणि राज्य सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री म्हणाले की, उघड्यावर शौच करणे आणि लघुशंका करणे यात फरक आहे. मी जिथे लघुशंका केली. त्याच्या आसपार मुतारी नव्हती. त्यामुळे नाईलाजाने मला उघड्यावर लघुशंका करावी लागली.