भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 16:30 IST2025-11-05T16:30:14+5:302025-11-05T16:30:58+5:30
एका भाजीवाल्यासोबत असंच काहीसं झालं आहे. त्याने लॉटरी खरेदी करण्यासाठी मित्राकडून पैसे उधार घेतले आणि आता तब्बल ११ कोटी रुपये जिंकले.

भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. एका भाजीवाल्यासोबत असंच काहीसं झालं आहे. त्याने लॉटरी खरेदी करण्यासाठी मित्राकडून पैसे उधार घेतले आणि आता तब्बल ११ कोटी रुपये जिंकले. या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. भाजीवाला करोडपती झाला असून त्याच्या कुटुंबीयांनाही मोठा आनंद झाला.
राजस्थानमधील जयपूर येथील कोटपुतली येथील रहिवासी असलेला अमित भाजी विकतो. त्याचं आयुष्य कोणत्याही भाजीवाल्या इतकंच अत्यंत साधं आणि आव्हानात्मक होतं. अमित त्याचा मित्र मुकेशसोबत पंजाबला गेला. रस्त्यामध्ये अमित आणि मुकेश एका हॉटेलमध्ये चहासाठी थांबले. अमित पहिल्यादाच पंजाबला गेला होता.
मुकेशने अमितला रतन लॉटरी एजन्सीबद्दल सांगितलं आणि दोन लॉटरीचे तिकीट खरेदी केले. तिकीट खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते, म्हणून मुकेशकडून पैसे उधार घेतले. आता अमितच नशीब फळफळलं आहे. त्याने ११ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. अमित म्हणतो की, तो या पैशांचा वापर त्याच्या मित्राच्या मुलींच्या लग्नासाठी करणार आहे आणि ५०-५० लाख दोन्ही मुलींना देणार आहे.
अमित त्याचं मैत्रीचं कर्तव्य पार पाडत आहे कारण त्याने मुकेशकडून उधार घेतलेल्या पैशांनी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. भटिंडा येथे खरेदी केलेलं लॉटरी तिकीट हे पंजाब राज्य दिवाळी बंपर २०२५ लॉटरीचा भाग होतं, ज्यामध्ये एकूण ३६ कोटींची बक्षिसं देण्यात आली होती. अमित जयपूरला गेला आणि तिथे त्याचा मोबाईल खराब झाला. लॉटरी निघाली तेव्हा त्याच्या नंबरवर कॉल करण्यात आला, पण फोन बंद येत होता. त्यानंतर मित्र मुकेशने अमितच्या घरी जाऊन जिंकलेल्या रकमेची माहिती दिली.