गुजरात निवडणूक अजून संपली नाही, तेच तिकडे भाजपने सुरू केली 'मिशन राजस्थान'ची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 15:08 IST2022-12-02T15:07:33+5:302022-12-02T15:08:29+5:30
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला विरोध म्हणून भाजपने जनआक्रोश यात्रा काढली आहे.

गुजरात निवडणूक अजून संपली नाही, तेच तिकडे भाजपने सुरू केली 'मिशन राजस्थान'ची तयारी
नवी दिल्ली: गुजरात विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यासाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. यादरम्यान आता भाजपने शेजारील राज्य राजस्थानकडे आपले लक्ष वळवले आहे. राजस्थानमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. राजस्थानमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे, पण 1990पासून तिथे दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा आहे.
भाजपने राजस्थानमधील दोन गट (माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे गट आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया गट) यांना एकत्र करण्याचा तसेच, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गुरुवारी जयपूरमध्ये 51 जनआक्रोश रथांना हिरवा झेंडा दाखवला, ज्यामध्ये राज्यातील सर्व 200 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असेल. यावेळी नड्डा यांनी राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर टीका करत त्यांना राज्यातील जनतेची नाही तर पक्ष वाचवण्याची चिंता असल्याचा आरोप केला.
युनिफाइड फेस आणि टीम फोकस
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील दोन्ही गट एकत्र यावेत आणि पीएम मोदीच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवावी, अशी भाजपची इच्छा आहे. या रणनीतीनुसार पक्षाने राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेविरोधात जन आक्रोश रथयात्रा सुरू केली आहे. या रथयात्रेत पक्षाचे सर्व बडे नेते सहभागी होणार आहेत.
75000 किलोमीटरचा प्रवास
3 ते 13 डिसेंबर दरम्यान सर्व विधानसभा मतदारसंघांतर्गत 200 रथ सुमारे 75,000 किलोमीटरचे अंतर कापतील, अशी योजना भाजपने आखली आहे. द प्रिंटच्या वृत्तानुसार, सतीश पुनिया, अरुण सिंग, वसुंधरा राजे, गुलाबचंद्र कटारिया, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि गजेंद्र शेखावत यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते या रथातून प्रवास करतील. तसेच, 14 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सुमारे 15-20 विधानसभा निवडणुकांनाही ते हजर राहून विविध रॅलींना संबोधित करतील.
रथयात्रेचा उद्देश
शेतकरी, बेरोजगारी आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर राज्यातील अशोक गेहलोत सरकारला कोंडीत पकडण्यासाठी भाजपच्या रथयात्रेचा उद्देश आहे. अशोक गेहलोत सरकारचा चौथा वर्षपूर्ती 17 डिसेंबर हा दिवस 'काळा दिवस' म्हणून भाजपची राज्य युनिट पाळणार आहे. जन आक्रोश रॅली 20 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.