राजस्थानमधील उदयपूर शहरामध्ये पोलिसांनी सायबर फ्रॉड करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. पोलियांनी सात जणांना अटक करून त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल आणि इतर सामुग्री जप्त केली आहे. उदयपूरमधील फसवणुकीचा हा खेळ दुबईहून खेळला जात होता. पोलिसांनी या ठकांकडून चार लॅपटॉप, २३ मोबाईल, १९ एटीएम कार्ड, ५ बँक पासबूक, ८ चेकबूक, एक राऊटर आणि २६ पानांचं एक रजिस्टर जप्त केलं आहे. आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार ऑनलाइन फसवणूक आणि सट्टेबाजीविरोधात चालवलेल्या अभियानांतर्गत प्रतापनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दुबईहून संचालित ५ कोटी रुपयांच्या ऑनलाईन गेमिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक उमेश ओझा आमि पोलीस उपाधीक्षक उदयपूर (पूर्व) छगन राज पुरोहित यांच्या निरीक्षणासाठी प्रतापनगरमधील ठाणे अधिकारी राजेंद्र सिंह यांच्या पथकाने देबारी स्थित एका इमारतीच्या फ्लॅट क्रमांक ८०७ मध्ये धाड टाकली.
या ठिकाणी सात तरुण हे लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टा खेळत असल्याचे दिसून आले. पकडण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी आपण दुबईहून चालणारी ऑनलाईन बेटिंग साईट रॉकीबूक.कॉमच्या मास्टर आयडीवरून चार इतर संकेतस्थळांवर लोकांकडून सट्टा घ्यायचो असे सांगितले. यामध्ये हरणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन जिंकणाऱ्यांना फायदा करून दिला जायचा. पोलिसांनी या फ्लॅटमधून सचिन जैन, नवीन पवार, ओम नारायण खटीक, कश्यप जैन, अजय खटीक, महेश काकड आणि अभिषेक ऊर्फ अभि प्रजापत यांना अटक केली आहे.
या ऑनलाईन सट्टा रॅकेटमधील इतर संचालक आणि सहकाऱ्यांचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. या नेटवर्कच्या बड्या संचालकांचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून अटक आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.