फिटनेस फ्रीक असूनही कार्डियक अरेस्ट... बॅडमिंटन खेळताना जमिनीवर कोसळले अन् श्वास थांबला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:47 IST2026-02-18T12:46:03+5:302026-02-18T12:47:03+5:30
अमृत बजाज यांचा बॅडमिंटन खेळताना अचानक कार्डियक अरेस्टने मृत्यू झाला.

फिटनेस फ्रीक असूनही कार्डियक अरेस्ट... बॅडमिंटन खेळताना जमिनीवर कोसळले अन् श्वास थांबला
छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील एका दुर्दैवी घटनेने शहरवासीयांना सुन्न केलं आहे. ४८ वर्षीय हार्डवेअर व्यावसायिक अमृत बजाज यांचा बॅडमिंटन खेळताना अचानक कार्डियक अरेस्टने मृत्यू झाला. ही घटना शहरातील अश्वनीनगर सोनकर बाडी बॅडमिंटन कोर्टवर सोमवारी सकाळी घडली. ओपन बॅडमिंटन कोर्टवर अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जात आहे. अमृत नेहमीप्रमाणे सकाळी कोर्टवर खेळायला आले होते, मात्र शटल उचलताच त्यांचा जीव गेला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
अमृत बजाज हे रायपूरमधील एक प्रतिष्ठित हार्डवेअर व्यापारी होते आणि आरोग्याबाबत अत्यंत जागरूक मानले जात होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता, परंतु नियमित व्यायामाने त्यांनी तो नियंत्रणात ठेवला होता. त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांच्या मते, अमृत बॅडमिंटनशिवाय क्रिकेटही खेळायचे आणि सकाळच्या दिनचर्येत खेळाला प्राधान्य द्यायचे. घटनेच्या दिवशी ते 'डबल्स' मॅच खेळत होते. सामन्यादरम्यान एक शॉट मारल्यानंतर लगेचच त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले.
सोबत खेळणाऱ्या खेळाडूंना सुरुवातीला वाटलं की, ते घसरून पडले आहेत, परंतु जेव्हा अमृत यांनी कोणतीही हालचाल केली नाही, तेव्हा ते तातडीने त्यांच्याकडे धावले आणि तिथेच त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण 'कार्डियक अरेस्ट' असल्याचं सांगण्यात आलं आहे. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये अमृत हे खेळताना आणि अचानक कोसळताना दिसत आहेत.
अमृत बजाज यांच्या पश्चात पत्नी आणि मुलं असा परिवार असून ते या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. अमृत हे एक उत्साही व्यक्ती होते आणि खेळ त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता, असं त्यांच्या मित्रांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नाही. शहरातील बॅडमिंटन प्रेमींमध्ये या घटनेमुळे शोककळा पसरली असून अनेक कोर्ट्सवर आता आरोग्य तपासणीचा सल्ला दिला जात आहे.