आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 19:56 IST2025-06-01T19:55:36+5:302025-06-01T19:56:10+5:30

आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे १५ जिल्ह्यातील ७८ हजार नागरिकांवर परिणाम झाला आहे

Rain Update: Floods from Assam to Sikkim; 30 deaths due to floods and landslides so far, IMD warning issued for Delhi | आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा

आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा

मागील काही दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या पावसामुळे भारताच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे आणि इतर सेवांवरही परिणाम झाला आहे. आसाम, त्रिपुरा, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुरामुळे आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवामान खात्याने पश्चिमी त्रिपुरा आणि खोवाई भागात रेड अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय भूस्खलन, पीकांचे नुकसान आणि वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता वर्तवली आहे.

त्रिपुरात १३०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी नेले

त्रिपुरात मुसळधार पाऊस पडत असून याठिकाणी १३०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. इम्फालमध्ये सुरक्षा जवान पाऊस आणि पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला तैनात आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आसाम, मणिपूर, सिक्किम, अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्‍यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन केंद्राने राज्याला दिले आहे. 

आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे १५ जिल्ह्यातील ७८ हजार नागरिकांवर परिणाम झाला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसवा हे अमित शाह यांच्या संपर्कात आहेत. राज्यातील परिस्थितीबाबत त्यांनी गृहमंत्र्यांना माहिती देत मदतीची विनंती केली आहे. केंद्रानेही राज्य सरकारला मदतीचे आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्र्‍यांनी त्यांच्या सोशल मिडिया खात्यावरून दिली आहे.

दरम्यान, रविवारी संध्याकाळी अचानक राजधानी दिल्लीतही वातावरणात बदल पाहायला मिळाला. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले. ज्यातून वादळ आणि पावसाची स्थिती आली. दिल्लीत हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत दिल्लीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीत ४ जूनपासून मान्सून सुरू होईल असं हवामान खात्याने म्हटलं होते. परंतु त्याआधीच वातावरणात बदल पाहायला मिळाला आहे. 

Web Title: Rain Update: Floods from Assam to Sikkim; 30 deaths due to floods and landslides so far, IMD warning issued for Delhi

टॅग्स :Rainपाऊस