राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेससह संघविरोधी पक्षांसाठी आत्मघातकीच : लालू यादव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 14:34 IST2019-05-28T14:33:41+5:302019-05-28T14:34:09+5:30
पराभवावर सर्वांनी मिळून मंथन करणे गरजेचे आहे. सर्वच्या सर्व विरोधीपक्ष भाजपला हटविण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु, संपूर्ण देशात या लोकांचा संदेश पोहचलाच नाही. त्यामुळे अपयश आल्याचे लालू यांनी विश्लेषणात म्हटले.

राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेससह संघविरोधी पक्षांसाठी आत्मघातकीच : लालू यादव
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या पक्षातील राजीनामा सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. खुद्द पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीच पराभवाची जबाबदारी स्वीकारात राजीनामा दिला आहे. त्यामुळे इतर नेते देखील राजीनामा देत आहेत. परंतु, राहुल यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आपले मत मांडले आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय केवळ काँग्रेससाठी आत्मघातकी नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध लढा देणाऱ्या संघटना, संस्था आणि पक्षांसाठी घातक ठरेल, अस लालू यांनी म्हटले आहे. एका इंग्रजी दैनिकाने लोकसभा निवडणुकीचं लालू यांनी केलेलं विश्लेषण प्रसिद्ध केले आहे. त्यात हा दावा करण्यात आला आहे.
विश्लेषणात लालू म्हणाले की, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणे म्हणजे भाजपच्या जाळ्यात फसण्यासारखे आहे. गांधी घराण्याव्यतिरिक्त कोणीही अध्यक्ष झाल्यास त्याला नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची ब्रिगेड गांधी घराण्याचं बाहुलं म्हणतील. या मुद्दावर भाजप पुढची निवडणूक लढवेल, त्यामुळे राहुल यांनी आपल्या विरोधकांना असं कऱण्याची संधी देऊ नये, असंही लालू यांनी म्हटले आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीतील पराभव हा विरोधकांचा सामूहिक पराभव आहे. त्यामुळे यावर सर्वांनी मिळून मंथन करणे गरजेचे आहे. सर्वच्या सर्व विरोधीपक्ष भाजपला हटविण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु, संपूर्ण देशात या लोकांचा संदेश पोहचलाच नाही. त्यामुळे अपयश आल्याचे लालू यांनी विश्लेषणात म्हटले.