गुजरात निवडणुकीत पक्षाविरोधात काम केलेल्यांविरोधात होणार कारवाई, राहुल गांधींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 08:49 PM2017-12-23T20:49:11+5:302017-12-23T20:51:39+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर गुजरातच्या दौ-यावर असलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची आक्रमक शैली पाहायला मिळाली

rahul gandhi says workers who did not help party will face action | गुजरात निवडणुकीत पक्षाविरोधात काम केलेल्यांविरोधात होणार कारवाई, राहुल गांधींचा इशारा

गुजरात निवडणुकीत पक्षाविरोधात काम केलेल्यांविरोधात होणार कारवाई, राहुल गांधींचा इशारा

Next

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शनिवारी गुजरातच्या दौ-यावर असलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची आक्रमक शैली पाहायला मिळाली. शनिवारी (23 डिसेंबर) राहुल गांधी यांनी गुजरातमधील पराभवाला पक्षातील लोकांनीच केलेला घात जबाबदार असल्याचे सांगितले. ज्यांनी पक्षाविरोधात काम केले, पक्षाला साथ दिलेली नाही, अशांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. '90 टक्के लोक आमच्यासोबत लढले तसेच अनेकांनी निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने प्रयत्न केले. मात्र, 5 ते 10 टक्के लोक असे होते ज्यांनी काँग्रेसला कसलीच मदत केली नाही, अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.’ असा इशारा यावेळी राहुल गांधी यांनी दिला. सोबत यावेळी त्यांनी भाजपावर हल्लाबोलही केला. काँग्रेस पक्ष एकत्रितपणे उभा राहतो तेव्हा पराभव होत नाही. निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी आपण जिंकलो. ते रागाने निवडणूक लढले त्यांच्याकडे सगळी साधने होती. पण आपण सत्याने, प्रेमाने निवडणूक लढलो असे राहुल म्हणाले.

भाजपाच्या आकस, द्वेषपूर्ण प्रचारामुळे पराभव झाला असे राहुल यांनी सांगितले. मागच्या वीस वर्षात भाजपा आणि मोदींनी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात राबवलेली बदनामीची मोहिम हे काँग्रेसच्या पराभवामागचे कारण आहे असे राहुल म्हणाले. भाषणाच्या शेवटी राहुल यांनी विजयाबद्दल भाजपाचे अभिनंदन करताना पुढची पाचवर्ष काँग्रेस सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावेल असे सांगितले.  
गुजरात दौ-यावर आलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी गुजरात निवडणुकीत भाजपाला कडवी टक्कर दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले. गुजरातमध्ये पुढचे सरकार काँग्रेस स्थापन करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या निवडणुकीत गुजरातमध्ये नवीन नेतृत्व उदयाला येत असल्याचे दिसले. राज्यात पुढचे सरकार आपले असेल असे त्यांनी सांगितले. पुढच्या निवडणुकीत गुजरातमध्ये आपण 135 जागा जिंकू, असेही राहुल यावेळी म्हणाले. 
 

Web Title: rahul gandhi says workers who did not help party will face action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.