“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 20:30 IST2025-09-18T20:25:09+5:302025-09-18T20:30:00+5:30
Rahul Gandhi: राहुल गांधींनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले. त्यानंतर आता देशातील Gen Z कडून संविधान, लोकशाही बचावाची अपेक्षा व्यक्त करत पाठीशी ठाम उभे राहण्याची ग्वाही दिली.

“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
Rahul Gandhi: केंद्रीय निवडणूक आयुक्त मतचोरीला संरक्षण देत आहेत. विरोधकांची नावे मतदार यादीतून वगळली जातात. त्यात प्रामुख्याने दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायाची नावे हटवण्यात आली. मतदारांची नावे जाणुनबुजून यादीतून काढण्यात आली. ज्यांच्या नावाने ही नावे काढली त्यांनाही याची कल्पना नाही. आळंदमध्ये याहून अधिक मते वगळली गेली असतील परंतु आम्ही ६ हजार मतदार काढले. इतर राज्यातील मोबाईल नंबर वापरून कर्नाटकातील मतदार यादीतून काढले गेले, असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. केंद्रीय निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला.
आमच्या आळंद उमेदवाराने फसवणूक उघड केल्यानंतर, स्थानिक निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने एफआयआर दाखल केला, परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने सीआयडी तपास रोखला आहे. कर्नाटक सीआयडीने १८ महिन्यांत १८ पत्रे लिहून सर्व गुन्हेगारी पुरावे मागितले आहेत, हेही केंद्रीय निवडणूक आयोगाने ब्लॉक केले. कर्नाटक निवडणूक आयोगाने चौकशीचे पालन करण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक विनंत्या पाठवल्या आहेत. परंतु, त्याही मुख्य निवडणूक आयुक्तांनी रोखल्या आहेत. डेस्टिनेशन आयपी, डिव्हाइस पोर्ट आणि ओटीपी ट्रेल्सचे तपशील लपवण्यात आले आहेत, हेदेखील केंद्रीय निवडणूक आयोगाने ब्लॉक केले. जर ही मतचोरी पकडली गेली नसती आणि ६,०१८ मते वगळली गेली असती तर आमचा उमेदवार निवडणूक हरला असता. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, सबबी देणे थांबवा. कर्नाटक सीआयडीला पुरावे द्या. आत्ताच, अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली.
देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील
आता देशातील युवक, देशातील विद्यार्थी, देशातील Gen Z संविधान वाचवतील. लोकशाहीचे रक्षण करतील आणि मतचोरीही रोखतील. मी सदैव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन, जय हिंद!, अशी एक पोस्ट राहुल गांधी यांनी एक्सवरून केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मतचोरांचे संरक्षण करत आहेत. प्रत्येक निवडणुकीत आमच्याकडे मतदार वगळले जात आहेत असा रिपोर्ट येत होता. काँग्रेसचे, विरोधकांचे मतदार यादीतून काढले जात होते. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक मतदार यादीतून काढले जातात. जी नावे यादीतून वगळली जातात ती विरोधकांची असतात असा आरोप करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.
देश के Yuva
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 18, 2025
देश के Students
देश की Gen Z
संविधान को बचाएंगे, लोकतंत्र की रक्षा करेंगे और वोट चोरी को रोकेंगे।
मैं उनके साथ हमेशा खड़ा हूं।
जय हिंद! pic.twitter.com/cLK6Tv6RpS
दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने तातडीने प्रत्युत्तर देत राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावले. राहुल गांधी यांनी केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला. तसेच कॉल सेंटरच्या मदतीने मतदारांची नावे कापण्यात आल्याचा राहुल गांधी यांनी केलेला आरोपही निवडणूक आयोगाने फेटाळून लावला असून, असे करणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. राहुल गांधी यांनी जसा दावा केला आहे तशा पद्धतीने कुठल्याही मतदाराचं नाव कुठलीही सर्वसामान्य व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने हटवू शकत नाही. कुठल्याही व्यक्तीचे नाव हटवण्यापूर्वी त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतले जाते, असा दावाही त्यांनी केला.