दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 17:19 IST2025-10-20T17:18:20+5:302025-10-20T17:19:41+5:30
Rahul Gandhi News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिवाळीनिमित्त जुन्या दिल्लीतील प्रसिद्ध आणि सुमारे २३७ वर्षांची परंपरा असलेल्या घंटेवाला मिठाईच्या दुकानाला भेट दिली. यावेळी राहुल गांधी यांनी येथे स्वत: मिठाई तयार करण्याचा अनुभव घेतला.

दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
दिवाळीला सुरुवात झाल्याने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. घरोघरी, गोडधोड मिळाईच्या पदार्थांची रेलचेल दिसून येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिवाळीनिमित्त जुन्या दिल्लीतील प्रसिद्ध आणि सुमारे २३७ वर्षांची परंपरा असलेल्या घंटेवाला मिठाईच्या दुकानाला भेट दिली. यावेळी राहुल गांधी यांनी येथे स्वत: मिठाई तयार करण्याचा अनुभव घेतला. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, त्यात राहुल गांधी हे दुकानाची पाहणी करताना आणि बेसनचे लाडू वळताना दिसत आहेत.
राहुल गांधी यांनी घंटेवाला मिठाईच्या दुकानाला दिलेल्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या भेटीबाबत राहुल गांधी यांनी सांगितले की, जुन्या दिल्लीमधील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक घंटेवाला मिठाईच्या दुकानाला भेट दिली. त्यावेळी इमरती बनवण्याचा आणि बेसनाचे लाडू वळण्याचा प्रयत्न केला. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या दुकानामधील मिठाई ही आजही तशीच पारंपरिक आणि मनाला भावणारी असते. दिवाळीचा खरा गोडवा हा केवळ गोडाधोडाच्या थाळीत नाही तर नाती आणि समाजामध्येही असतो, असेही राहुल गांधी म्हणाले. तसेच तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी करत आहात आणि तिला कसं खास बनवत आहात, हे तुम्हीही सांगा, असं आवाहनही राहुल गांधी यांनी केलं.
पुरानी दिल्ली की मशहूर और ऐतिहासिक घंटेवाला मिठाइयों की दुकान पर इमरती और बेसन के लड्डू बनाने में हाथ आज़माया।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 20, 2025
सदियों पुरानी इस प्रतिष्ठित दुकान की मिठास आज भी वही है - ख़ालिस, पारंपरिक और दिल को छू लेने वाली।
दीपावली की असली मिठास सिर्फ़ थाली में नहीं, बल्कि रिश्तों और समाज… pic.twitter.com/bVWwa2aetJ
घंटेवाला मिठाईच्या दुकानाबाबत बोलायचं झाल्यास जुन्या दिल्लीमधील घंटेवाला मिठाईचं दुकान हे २३७ वर्षे जुनं आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी हेसुद्धा या दुकानाचे ग्राहक होते. एवढंच नाही तर राजीव गांधी यांच्या विवाह सोहळ्यातही याच दुकानातून मिठाई पाठवण्यात आली होती. दरम्यान, आता तुमच्या विवाहाची वाट पाहत आहे, मात्र मिठाईची ऑर्डर आम्हालाच द्या, असं यावेळी दुकान मालकांनी राहुल गांधी यांना गमतीने सांगितले.