पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 18:25 IST2025-12-16T18:24:38+5:302025-12-16T18:25:46+5:30
Rahul Gandhi: केंद्र सरकारने आणलेल्या या विधेयकामुळे राजकारण तापले आहे.

पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
Rahul Gandhi: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावित ‘जी राम जी’ विधेयकावर जोरदार टीका केली आहे. हे विधेयक महात्मा गांधींच्या विचारांचा अपमान असून, मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीबांच्या हक्कांवर गदा आणू पाहत आहेत आणि ग्रामीण भागातील आर्थिक सुरक्षिततेचा आधार असलेली मनरेगा मिटवण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले.
मनरेगामध्ये बदलाचा प्रस्ताव
केंद्र सरकारने संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मनरेगामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ही योजना 2005 साली काँग्रेसच्या यूपीए सरकारने सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला.
‘महात्मा गांधींच्या आदर्शांचा अपमान’
राहुल गांधी म्हणाले की, ‘जी राम जी’ विधेयक आणणे म्हणजे महात्मा गांधींच्या आदर्शांचा अपमान आहे. मनरेगा हटवून किंवा कमकुवत करून मोदी सरकार ग्रामीण गरीबांच्या सुरक्षित उपजीविकेवर आघात करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सोशल मीडियावरून टीका
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हटले की, पंतप्रधान मोदी महात्मा गांधींच्या विचारांच्या विरोधात असून, 2014 पासून गांधींच्या नावाने चालणाऱ्या योजनांना कमजोर करत आहेत. काँग्रेस या सर्व निर्णयांचा निषेध करते.
मोदी जी को दो चीज़ों से पक्की नफ़रत है - महात्मा गांधी के विचारों से और गरीबों के अधिकारों से।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 16, 2025
मनरेगा, महात्मा गांधी के ग्राम-स्वराज के सपने का जीवंत रूप है - करोड़ों ग्रामीणों की ज़िंदगी का सहारा है, जो कोविड काल में उनका आर्थिक सुरक्षा कवच भी साबित हुआ।
मगर, प्रधानमंत्री मोदी…
मनरेगाचे महत्त्व अधोरेखित
राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये लिहिले, पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींची खूप चीड आहे. पहिले- महात्मा गांधींचे विचार आणि दुसरे- गरीबांचे हक्क. मनरेगा हा गांधींच्या ग्राम-स्वराज्याच्या स्वप्नाचा अवतार आहे. कोट्यवधी ग्रामीण नागरिकांसाठी ही योजना उपजीविकेचा आधार असून, कोविड काळात आर्थिक सुरक्षा कवच ठरली.
राहुल गांधींनी मनरेगाची तीन मूलभूत तत्त्वे सांगितले.
- रोजगाराचा अधिकार - काम मागणाऱ्याला काम मिळणार
- गावांना स्वायत्तता - विकासकामे ठरवण्याचे स्वातंत्र्य
- केंद्राची जबाबदारी - मजुरीचा संपूर्ण खर्च आणि साहित्य खर्चाच्या 75 टक्के रकमेची तरतूद
नव्या विधेयकाबाबत आक्षेप
राहुल गांधींच्या मते, नव्या विधेयकामुळे बजेट, योजना व नियम केंद्र सरकारच ठरवेल, राज्यांवर 40 टक्के खर्चाचा बोजा टाकला जाईल आणि बजेट संपल्यानंतर किंवा कापणीच्या हंगामात दोन महिने काम बंद राहील. यामुळे सत्तेचे केंद्रीकरण होऊन राज्यांची आणि ग्रामपंचायतींची भूमिका दुय्यम ठरेल, असा इशारा त्यांनी दिला.
जनविरोधी विधेयकाचा विरोध
राहुल गांधी म्हणाले की, देशात आधीच भयानक बेरोजगारीमुळे तरुणांचे भवितव्य धोक्यात आले आहे. आता हे विधेयक ग्रामीण गरीबांच्या रोजीरोटीवर घाला घालणारे आहे.या जनविरोधी विधेयकाचा आम्ही गावागावात आणि संसदेत तीव्र विरोध करू, असे त्यांनी ठामपणे सांगितले.