‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:13 IST2025-12-25T18:12:32+5:302025-12-25T18:13:16+5:30
Sam Pitroda News: इंडियन ओव्हरसिज काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे. परदेश दौऱ्यांदरम्यान, राहुल गांधींवर केंद्र सरकारकडून पाळत ठेवली जाते, असा आरोप सॅम पित्रोदा यांनी केला आहे.

‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरून देशातील राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा आणि आरोप प्रत्यारोप होत असतात. दरम्यान, इंडियन ओव्हरसिज काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे. परदेश दौऱ्यांदरम्यान, राहुल गांधींवर केंद्र सरकारकडून पाळत ठेवली जाते, असा आरोप सॅम पित्रोदा यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरून भाजपाकडून करण्यात येणारे आरोप फेटाळून लावले. तसेच परदेश दौऱ्यांदरम्यान भारतीय दूतावासामधील लोक राहुल गांधींवर पाळत ठेवून असतात. तसेच अनेक परदेशी नेत्यांना राहुल गांधी यांची भेट घेऊ नका, असे सांगितले जाते, असा आरोप पित्रोदा यांनी केला.
राहुल गांधी यांनी हल्लीच जर्मनीचा दौरा केला होता. या दौऱ्यावेळी राहुल गांधी यांनी भारतामधील लोकशाहीच्या स्थितीसह अनेक मुद्द्यांवर परखड भाष्य केले होते. दरम्यान, राहुल गांधी यांच्या या दौऱ्याच्या टायमिंगवरून अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते. आता सॅम पित्रोदा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, आता परदेश दौरे हे अचानक होत नाहीत. तर अनेक महिन्यांपूर्वी त्यांचं नियोजन होतं. जर्मन दौऱ्याचा मुख्य हेतू हा पुरोगामी आघाडीची बैठक हा होता. त्यात सुमारे ११० देशातील पुरोगामी पक्ष सहभागी झाले होते.
यावेळी राहुल गांधींवर परदेशात जाऊन भारत विरोधी वक्तव्ये करत असल्याच्या होणाऱ्या आरोपांबाबत सॅम पित्रोदा यांनी परखड शब्दात प्रत्युत्तर दिले. आजच्या काळात तुम्ही भारतामध्ये जे काही बोलता ते जगभरात पसरतं आणि जे बाहेर बोलता ते देशात पसरतं. खरंतर तुम्हा देशात बोला अगर परदेशात बोला, सत्य हे सत्यच असतं, असा टोलाही पित्रोदा यांनी लगावला.
जर काँग्रेसला संस्थांवर कब्जा होत आहे, प्रसारमाध्यमे पक्षपात करत आहेत, सिव्हिल सोसायटीला कमकुवत केलं जात आहे, असं वाटत असेल तर ही बाब देशातही सांगितली जाईल आणि परदेशातही सांगितली जाईल, असेही पित्रोदा यांनी सांगितले.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान, भारतीय दूतावासातील अधिकारी सातत्याने त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून असतात. हॉटेलपासून बैठकांपर्यंत तसेच विमानतळांवर लोक आमच्यावर लक्ष ठेवून असतात. एवढंच नाही तर दुतावासामधील लोक फोन करून राहुल गांधी यांना भेटू नका, असे विदेशी नेत्यांना सांगतात, याबाबतचे लेखी पुरावे नाहीत, मात्र हे मी अनुभवाच्या आधारावर सांगू शकतो, असा दावाही सॅम पित्रोदा यांनी केला.