ज्यांना भारत समजला नाही, त्यांना संघ कसा समजणार?; संघाचा राहुल गांधींवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 16:07 IST2018-08-27T16:04:07+5:302018-08-27T16:07:38+5:30
राहुल गांधींच्या टीकेला संघाचं जोरदार प्रत्युत्तर

ज्यांना भारत समजला नाही, त्यांना संघ कसा समजणार?; संघाचा राहुल गांधींवर पलटवार
नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तुलना मुस्लिम ब्रदरहूडशी करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आता संघाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राहुल गांधी यांना भारतच समजला नाही. त्यामुळे त्यांना संघदेखील समजणार नाही, अशा शब्दांमध्ये संघानं राहुल गांधींवर पलटवार केला आहे.
RSSच्या कार्यक्रमात राहुल गांधी? कट्टर डाव्या येचुरींनाही बोलावणं
गेल्या आठवड्यात लंडनमधील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटर्जिक स्टडिजमध्ये भाषण करताना राहुल गांधींनी संघावर निशाणा साधला होता. आखाती देशांमधील मुस्लिम ब्रदरहूड आणि संघाची विचारसरणी सारखीच आहे, अशी टीका राहुल यांनी केली होती. संघाकडून भारतातील संस्था ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला होता. राहुल गांधींच्या या टीकेला संघाचे प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींना मुस्लिम ब्रदरहूडची विचारसरणी माहित नाही, असं कुमार म्हणाले आहेत.
राहुल गांधी यांनी केली RSS ची 'मुस्लिम ब्रदरहुड'शी तुलना; भाजप भडकली
सध्या संपूर्ण जग इस्लामिक दहशतवादाचा सामना करत असल्याचं अरुण कुमार म्हणाले. राहुल गांधी याबद्दल अनभिज्ञ आहेत. त्यांना या प्रकरणाच्या गांभीर्याची कल्पना नाही. त्यामुळेच ते अशी विधानं करतात, असं अरुण कुमार यांनी म्हटलं. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वीच आपण भारत समजून घेत असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाचाही कुमार यांनी समाचार घेतला. ज्यांना भारत समजला नाही, त्यांना संघ कसा समजणार?, असा प्रश्न उपस्थित कुमार यांनी राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडलं.