'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 19:14 IST2025-12-24T19:13:32+5:302025-12-24T19:14:02+5:30
Rahul Gandhi Met Unnao Victim: उन्नाव प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगरला जामीन मिळाल्याने राहुल गांधी संतप्त झाले.

'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
Rahul Gandhi Met Unnao Victim: उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पीडितेने राहुल गांधींना सांगितले की, आपली व्यथा आणि न्यायाची मागणी थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचवायची आहे. ही भेट बुधवारी नवी दिल्लीतील सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी झाली. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राहुल गांधींची पीडिता व तिच्या आईशी भेट
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उन्नाव बलात्कार पीडिता आणि तिच्या आईशी सविस्तर चर्चा केली. या भेटीत राहुल गांधींनी दोघींची बाजू शांतपणे ऐकून घेतली आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
कुलदीप सिंह सेंगरच्या जामिनाला विरोध
दरम्यान, पीडिता आणि तिची आई या दोघीही या प्रकरणातील दोषी ठरवण्यात आलेला माजी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाला तीव्र विरोध करत आहेत. सेंगरने आपल्या जन्मठेपेच्या शिक्षेला आणि निकालाला आव्हान दिले असून, न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत ते जामिनावर बाहेर राहणार आहेत.
क्या एक गैंगरेप पीड़िता के साथ ऐसा व्यवहार उचित है?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 24, 2025
क्या उसकी “गलती” ये है कि वो न्याय के लिए अपनी आवाज़ उठाने की हिम्मत कर रही है?
उसके अपराधी (पूर्व BJP MLA) को ज़मानत मिलना बेहद निराशाजनक और शर्मनाक है - खासकर तब, जब पीड़िता को बार-बार प्रताड़ित किया जा रहा हो, और वो डर के… https://t.co/BZqrVNXMOy
सेंगरच्या जामिनावर राहुल गांधी संतप्त
कुलदीप सिंह सेंगरला जामीन मिळाल्याने राहुल गांधी संतप्त झाले. त्यांनी म्हटले की, अशा गुन्हेगाराला जामीन मिळणे लाजिरवाणे आणि निराशाजनक आहे. पीडिता आजही भीतीच्या छायेत जगत असताना जामीन देणे हे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे, असेही त्यांनी सांगितले. न्याय मागणे ही पीडितेची चूक आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी (23 डिसेंबर) कुलदीप सिंह सेंगर लावा अटींसह जामीन मंजूर केला. तसेच त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. खालच्या न्यायालयाने 2019 मध्ये सेंगर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
न्यायालयाने सेंगर याला 15 लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेचे तीन जामीनदार सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात जाणार पीडिता
कुलदीप सिंह सेंगर याची शिक्षा स्थगित करण्याच्या निर्णयाविरोधात पीडिता आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. सेंगर याला दिलेली सवलत आपल्या कुटुंबासाठी मृत्यूसारखी असल्याचे सांगत, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार पीडितेने व्यक्त केला आहे.