Rafale deal: सरकारनं रिलायन्सला कंत्राट देऊन HALचा अपमान केला- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 18:35 IST2018-10-13T18:32:12+5:302018-10-13T18:35:02+5:30
राहुल गांधींचा पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा

Rafale deal: सरकारनं रिलायन्सला कंत्राट देऊन HALचा अपमान केला- राहुल गांधी
बंगळुरु: राफेल विमान खरेदीच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर वारंवार निशाणा साधणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज हिंदुस्तान एरॉनिटिक्स लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंदुस्तान एरॉनिटिक्स लिमिटेडमध्ये काम करणं अभिमानास्पद आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात काही सामरिक महत्त्व असलेल्या संस्थांची उभारणी करण्यात आली. त्यात हिंदुस्तान एरॉनिटिक्स लिमिटेडचा समावेश होतो, असं राहुल गांधी म्हणाले.
अनिल अंबानींच्या रिलायन्सला राफेलचं कंत्राट दिल्यानं राहुल यांनी अनेकदा मोदींना लक्ष्य केलं आहे. हिंदुस्तान एरॉनिटिक्स लिमिटेड (एचएएल) आधुनिक भारताचं मंदिर आहे. राफेलचं कंत्राट रिलायन्सला देऊन सरकारनं एचएएलचा अपमान केल्याचं राहुल गांधी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले. 'देशासाठी तुम्ही जी कामगिरी बजावली आहे, ती अतिशय शानदार आहे. देशाच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एचएएल कर्मचाऱ्यांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. उच्च शिक्षणात जे आयआयटीचं स्थान आहे, तेच संरक्षण क्षेत्रात एचएएलचं स्थान आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचं काम एचएएलनं केलं आहे,' अशा शब्दांमध्ये राहुल यांनी एचएएलच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं.
काँग्रेस अध्यक्षांनी एचएएलच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या एका विधानाचा संदर्भ दिला. भविष्यात फक्त भारत आणि चीन हे दोनच देश अमेरिकेशी स्पर्धा करु शकतात, असं ओबामा म्हणाले होते. ओबामांच्या त्या विधानावरुन तुमच्या योगदानाचं महत्त्व लक्षात येतं, असं राहुल म्हणाले. मी तुमच्या मनातलं ऐकायला आलो आहे, असं त्यांनी म्हटलं. यानंतर एचएएलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. एका 70 वर्षे जुन्या कंपनीला मिळणारं कंत्राट रिलायन्सला देण्यात आलं. हे आमच्यासाठी अपमानास्पद असल्याची भावना एचएएलचे निवृत्त कर्मचारी असलेल्या सिराजुद्दीन यांनी व्यक्त केली. ज्या कंपनीत सुधारणा करायला हव्यात, त्या कंपनीला संपवलं जातं असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखवली.