पुन्हा मानहानी प्रकरण; राहुल गांधींच्या अडचणीत वाढणार? 26 जुलैला कोर्टात हजर राहणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 22:06 IST2024-07-24T21:51:59+5:302024-07-24T22:06:55+5:30
मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुलतानपूरच्या खासदार/आमदार न्यायालयाने 26 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

पुन्हा मानहानी प्रकरण; राहुल गांधींच्या अडचणीत वाढणार? 26 जुलैला कोर्टात हजर राहणार...
Rahul Gandhi Defamation Case : काँग्रेस खासदार अन् लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. अमित शाह हेट स्पीच प्रकरणात न्यायालयाने त्यांना शुक्रवारी (26 जुलै) सुलतानपूरच्या खासदार/आमदार न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. पुढील सुनावणीत ते हजर न झाल्यास, त्यांच्यावर कारवाईदेखील होऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधीअमित शाह मानहानी प्रकरणात सुलतानपूरच्या खासदार/आमदार न्यायालयात 2 जुलै रोजी हजर होणार होते. पण, राहुल गांधी संसदेत असल्यामुळे त्यांच्या वकिलाने कोर्टात हजर राहण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर न्यायालयाने याप्रकरणाची पुढील सुनावणी 26 जुलै रोजी ठेवली असून, त्या दिवशी राहुल यांना हजर राहण्यास सांगितले आहे.
राहुल गांधी यांचे वकील काशी प्रसाद शुक्ला यांनी सांगितले की, सुलतानपूरच्या खासदार-आमदार न्यायालयात गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. राहुल गांधी यांना त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी कोर्टाने वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे प्रकरण ?
साडेपाच वर्षांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे दुखावलेल्या भाजपचे तत्कालीन सुलतानपूर जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारीत विजय मिश्रा यांनी 2018 साली राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.
दोषी आढळल्यास किती शिक्षा होणार?
भाजप नेते विजय मिश्रा यांचे वकील संतोष कुमार पांडे म्हणाले की, राहुल गांधींविरोधात पुरेसे पुरावे आढळल्यास त्यांना जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.