Rahul Gandhi Bihar:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मतदार हक्क यात्रा काढली आहे. या यात्रेदरम्यान, ते बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जाणार आहेत. दरम्यान, ही यात्रा मंगळवारी नवादा जिल्ह्यात पोहोचली. यावेळी, एक मोठा अपघात झाला. दौऱ्यादरम्यान राहुल गांधींच्या गाडीने एका पोलिस कॉन्स्टेबलला जोराची धडक दिली. या घटनेत त्या पोलिसाला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, भाजपने या घटनेवरुन राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?नवादा येथे राहुल गांधींच्या मतदार हक्क दौऱ्यादरम्यान त्यांच्या गाडीने एका पोलिसाला धडक दिली. हा पोलिस राहुल यांच्या गाडीखाली आला. यानंतर तात्काळ उपस्थितांनी त्या पोलिसाला बाहेर काढले. राहुल गांधी यांनीदेखील त्या पोलिसाला जवळ बोलवून त्याची विचारपूस केली. तसेच, त्या जखमी पोलिसाला स्वतःच्या गाडीत बसवून पाणी पाजले. मिळालेल्या माहितीनुसार, त्या पोलिसाला गंभीर दुखापत झालेली नाही. पण, आता भाजपने यावरुन काँग्रेसच्या यात्रेवर जोरदार टीका केली आहे.
भाजपची टीकाकाँग्रेसचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी या घटनेचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करत काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'राहुल गांधींच्या गाडीने एका पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, ज्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. राहुल त्या जखमी कॉन्स्टेबलला पाहण्यासाठी खालीही उतरले नाही. ही मतदार अधिकार यात्रा नाही, तर जनतेला चिरडणारी यात्रा आहे,' अशी बोचरी टीका त्यांनी केली.