राजकोटमध्ये राडा! खासदार राजीव सातव यांना अटक, पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 10:12 IST2017-12-03T09:16:39+5:302017-12-03T10:12:37+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे. तसतसे तेथील राजकीय वातावरणही गरम झाले आहे. सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आतापर्यंत शाब्दिक स्तरावर सुरू असलेला वादविवाद आता हातघाईवर आला आहे.

राजकोटमध्ये राडा! खासदार राजीव सातव यांना अटक, पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप
राजकोट - गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे. तसतसे तेथील राजकीय वातावरणही गरम झाले आहे. सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आतापर्यंत शाब्दिक स्तरावर सुरू असलेला वादविवाद आता हातघाईवर आला आहे. काँग्रेस उमेदवाराच्या भावाला झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याघरासमोर निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये महाराष्ट्रामधील काँग्रेस खासदार राजीव सातव यांचाही समावेश आहे. दरम्यान पोलिसांनी खासदार सातव यांना मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
राजकोटमध्ये काँग्रेस उमेदवार इंद्रनिल राजगुरू यांचे भाऊ दीप राजगुरू यांच्यावर भाजपाचे पोस्टर काढण्यावरून हल्ला झाला होता. त्यानंतर विजय रुपानींच्या घराबाहेरचे पोस्टर काढण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान दीप राजगुरू यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये भाजपाचा हात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करतानाच राजीव सातव यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली होती. नंतर त्यांची जामीनावर मुक्तता केली.