पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:08 IST2025-12-05T17:05:57+5:302025-12-05T17:08:04+5:30
India And Russia 7 Agreement: पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा संपन्न झाली.

पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
India And Russia 7 Agreement: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन भारत दौऱ्यावर आहेत. अनेकार्थाने पुतिन यांचा भारत दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अवघ्या जगाचे लक्ष या दौऱ्याकडे आहे. सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः पुतिन यांचे स्वागत करण्यासाठी पालम विमानतळावर गेले. यानंतर दोघे पंतप्रधान निवासस्थानी पोहोचले. यानंतर शुक्रवारी दोन्ही देशांमध्ये अनेक क्षेत्रात मोठे आणि महत्त्वाचे करार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, व्लादीमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा संपन्न झाली. चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये करारांची देवाणघेवाण झाली. पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान झालेल्या करारांमध्ये कामगार स्थलांतर, आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, अन्न सुरक्षा, जहाजबांधणी, रसायने आणि खते यासारख्या मुद्द्यांचा समावेश होता. पुतिन यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी रशियाच्या लोकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली. भारताने रशियन लोकांसाठी मोफत ई-टूरिस्ट व्हिसा सुरू केला आहे. हा ई-व्हिसा ३० दिवसांसाठी वैध असेल.
भारत आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये कोणते करार झाले?
१. सहकार्य आणि स्थलांतर करार
२. तात्पुरत्या कामगार उपक्रम करार
३. आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण करार
४. अन्न सुरक्षा आणि मानक करार
५. ध्रुवीय जहाजांसदर्भात करार
६. सागरी सहकार्य करार
७. खतांसंदर्भात करार
दरम्यान, खतांवरील करारात अशी अट होती की, भारत आणि रशिया संयुक्तपणे युरियाचे उत्पादन करतील. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात युरिया आयात करतो. या करारामुळे आता भारताला रशियाच्या सहकार्याने युरियाचे उत्पादन करण्याची परवानगी मिळेल.