पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 18:31 IST2025-12-05T18:30:50+5:302025-12-05T18:31:49+5:30
Putin India Visit: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे.

पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
Putin India Visit: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. ते 23व्या भारत-रशिया समिटमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीमध्ये आले असून, आज रात्री रशियाला रवाना होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी राष्ट्रपती भवनात त्यांच्या सन्मानार्थ स्टेट डिनरचे आयोजन करण्यात आले आहे.
कोणाला निमंत्रण?
मीडिया रिपोर्ट्समध्ये सूत्र्यांच्या हवाल्याने दावा करण्यात आलाय की, या कार्यक्रमाला राजकारणासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना निमंत्रण पाठवले नाही. त्याउलट, काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांना डिनरसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
राहुल गांधींच्या आरोपांनंतर नवीन वाद
हे संपूर्ण प्रकरण अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा पुतिन यांच्या येण्याच्या एक दिवस आधी राहुल गांधींनी त्यांची भेट नाकारल्यचा आरोप केला होता. संसद भवनात मीडियाशी संवाद साधताना राहुल म्हणाले की, परंपरेनुसार परदेशातून येणारा प्रत्येक पाहुणा विरोधी पक्षनेत्याला भेटतो. वाजपेयीजी आणि मनमोहनसिंह यांच्या काळातही हेच होत होते. पण सध्याचे केंद्र सरकार विदेशी पाहुण्यांना विरोधी पक्षनेत्याला न भेटण्याचा सल्ला देते.
मात्र, सरकारने राहुल गांधींचे आरोप निराधार ठरवत सांगितले होते, राहुल गांधी 9 जून 2024 रोजी विरोधी पक्षनेते झाले असून, ते आतापर्यंत चार परदेशी राष्ट्रप्रमुखांना भेटले आहेत. त्यात बांग्लादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांचाही समावेश आहे. तसेच हेही स्पष्ट करण्यात आले की, पाहुणा ठरवत असतो की, तो सरकारबाहेरील व्यक्तींना भेटणार की नाही. यात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचा काहीही हस्तक्षेप नसतो.