आजकाल चोरी आणि दरोड्याच्या घटना इतक्या वाढल्या आहेत की सार्वजनिक ठिकाणी एकटीने प्रवास करणं देखील सुरक्षित नाही. फक्त रात्रीच नाही तर लोक दिवसाढवळ्या बंदुकीच्या धाकावर लोकांना लुटतात. विशेषतः महिलेला एकटी पाहून लगेच टर्गेट करतात. पंजाबमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे.
काही चोरांनी ऑटोमध्ये एका महिलेला लुटण्याचा प्रयत्न केला. पण महिलेने धैर्याने त्यांचा सामना केला आणि आपला जीव वाचवला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंजाबमधील जालंधर येथून एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्याने इंटरनेटवर सर्वांचं लक्ष वेधलं आहे. व्हिडिओमध्ये एका धाडसी महिलेने ऑटोमध्ये बसलेल्या चोरांपासून स्वतःला वाचवण्याचं धाडस दाखवलं. ही घटना फिल्लौर आणि लुधियाना दरम्यान राष्ट्रीय महामार्ग (NH) ४४ वर घडली.
रिपोर्टनुसार, महिला तिच्या गावी जात होती आणि रस्त्यात एका ऑटोमध्ये बसली. आधीच तीन लोक बसले होते. काही वेळाने त्यांनी महिलेला धारदार शस्त्र दाखवून धमकावलं आणि लुटण्याचा प्रयत्न केला. स्वतःला वाचवण्यासाठी ती महिला चालत्या ऑटोमधून बाहेर पडली आणि ओरडू लागली. रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांकडून मदत मागू लागली.
ऑटो चालकाने घाबरून वेगाने ऑटो चालवली आणि एका कारलाही धडक दिली. तरीही, महिलेने हिंमत गमावली नाही आणि तिच्या सर्व शक्तीनिशी प्रतिकार केला, ज्यामुळे ऑटो उलटली. याच दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी दोन चोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. तिसरा घटनास्थळावरून पळून गेला. महिलेच्या धाडसामुळे तिचा जीव वाचलाच नाही तर दोन गुन्हेगारांना पकडण्यातही मदत झाली. पोलिसांनी सांगितलं की ते आता तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.