थार गाडीतून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या महिला हवालदाराला अटक; पकडताच दाखवले अधिकाऱ्यासोबतचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:26 IST2025-04-04T16:21:18+5:302025-04-04T16:26:52+5:30

पंजाबमध्ये ड्रग्जची तस्करी करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला अंमली पदार्थासह अटक करण्यात आली.

Punjab Police dismissed constable Amandeep Kaur from service after caught with heroin | थार गाडीतून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या महिला हवालदाराला अटक; पकडताच दाखवले अधिकाऱ्यासोबतचे फोटो

थार गाडीतून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या महिला हवालदाराला अटक; पकडताच दाखवले अधिकाऱ्यासोबतचे फोटो

Police Constable Amandeep Kaur:पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकारने ड्रग्जविरोधात कठोर मोहिम सुरु केली आहे. पंजाबमधून ड्रग्ज मुळापासून हटवण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पावलं उचलली आहे. मात्र दुसरीकडे पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचे हात ड्रग्ज तस्करीमध्ये गुंतल्याचे समोर आलं आहे. पंजाब पोलीस दलातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला ड्रग्जची तस्करी करताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. महिला कर्मचाऱ्याच्या चौकशीनंतर अनेक धक्कादायक खुलासे देखील झाले आहेत.

पंजाब पोलीस दलातील कर्मचारी अमनदीप कौर हिला १७ ग्रॅम हेरॉईनसह रंगेहाथ पकडण्यात आले. भटिंडा पोलिसांनी कॉन्स्टेबल अमनदीप कौरला १७.७१ ग्रॅम हेरॉईनसह पकडले. अमनदीप कौर तिच्या थार गाडीतून हरियाणाला ड्रग्जची तस्करी करण्यासाठी जात होती. गुरुवारी चंदीगडच्या एका विशेष पथकाने पोलीस स्टेशन कॅनॉलमध्ये पोलिस कोठडीत दोन तासांहून अधिक काळ अमनदीप कौरची चौकशी केली. या चौकशीत आरोपी अमनदीप कौरने अनेक मोठे आणि महत्त्वाचे खुलासे केले आहेत. आरोपी अमनदीप कौरचे कोणत्या आयपीएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत, याचाही सखोल तपास पथक करत आहे.

पंजाब पोलिसांनी अमनदीप कौरची एसयूव्हीही जप्त केली आहे. पोलिस महानिरीक्षक सुखचैन सिंग गिल यांनी याबाबत माहिती दिली. कॉन्स्टेबल अमनदीप कौर ही चक्क फतेह सिंग वाला येथील रहिवासी असून तिला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याआधी तिची नियुक्ती मानसा येथे झाली होती, मात्र नंतर ती भटिंडाच्या पोलीस लाईन्समध्ये रुजू झाली होती. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. अमनदीप कौरने गुन्ह्यातून मिळवलेल्या मालमत्तेचीही पोलिस चौकशी करणार आहेत. कायद्यानुसार त्या मालमत्तांवरही कारवाई केली जाईल, असं सुखचैन सिंग गिल म्हणाले.

अमनदीप कौरने तिच्या लाईफस्टाईलमुळे आधीच अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. ती अनेकदा इन्स्टाग्रामवर तिच्या थारसोबत रील पोस्ट करायची. भठिंडा येथे तसाणीसाठी थांबवले तेव्हा अमनदीपने काही व्हॉट्सॲप मेसेज, चॅट्स आणि फोटो दाखवले होते. तिचे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याशी चांगले संबंध असल्याचे ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पोलिसांनी कठोर भूमिका घेत तिला ताब्यात घेत अटक केली.

दरम्यान, अमनदीप कौरसह तस्करी करणाऱ्या बलविंदर सिंग उर्फ ​​सोनूवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अमनदीप २०११ मध्ये पंजाब पोलिसात भरती झाली होती. २०१५ मध्ये तिने प्रेमविवाह केला होता, पण नंतर ती पतीपासून वेगळी राहू लागली. २०२० मध्ये अमनदीपची रुग्णवाहिका चालक बलविंदर सिंग उर्फ ​​सोनूसोबत भेट झाली. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि नंतर दोघांनी  रुग्णवाहिकेच्या आडून तस्करीचा धंदा सुरू केला. रुग्णवाहिकेत ड्रग्ज तस्करी करण्याची कल्पनाही अमनदीप कौरची होती.
 

Web Title: Punjab Police dismissed constable Amandeep Kaur from service after caught with heroin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.