हृदयद्रावक! लाईनमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; बातमी ऐकून आईने सोडला जीव, एकत्र अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 11:29 IST2025-12-24T11:28:23+5:302025-12-24T11:29:24+5:30
ट्रान्सफॉर्मरवर काम करत असताना विजेचा धक्का लागून एका लाईनमनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

हृदयद्रावक! लाईनमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; बातमी ऐकून आईने सोडला जीव, एकत्र अंत्यसंस्कार
पंजाबमधील पटियाला येथे ट्रान्सफॉर्मरवर काम करत असताना विजेचा धक्का लागून एका लाईनमनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच, आईलाही हार्ट अटॅक आला आणि तिचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भवालपूर गावात घडली. संजीव कुमार असं मृत्यू झालेल्या लाईनमनचं नाव असून तो वीज विभागात कार्यरत होता. २२ डिसेंबर रोजी तो एका ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करण्यासाठी वर चढला होता. त्याच वेळी अचानक वीज पुरवठा सुरू झाला आणि संजीवला करंट लागला. तो उंचावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
संजीवच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, जेई हरप्रीत सिंह याने दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला 'परमिट' घेतला नव्हता. या हलगर्जीपणामुळेच संजीवचा जीव गेल्याचा दावा कुटुंबाने केला आहे. पोलिसांनी संजीवच्या वडिलांच्या जबाबावरून जेई हरप्रीत सिंह विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्याची आई सिमरन देवी यांना मोठा धक्का बसला. त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. एकाच वेळी घरातून माय-लेकाची अंत्ययात्रा निघाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संजीवच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे. संजीव हा घरचा एकमेव कमावता आधार होता. "संजीवचा मृत्यू कर्तव्यावर असताना झाला आहे, त्यामुळे त्याच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्यात यावी, जेणेकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकेल" अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.