Navjot Singh Sidhu : "कॅप्टन अमरिंदर सिंग यांना तर पत्नीही साथ देत नाही, तर मग दुसरं कोण कसं उभं राहणार?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 10:39 IST2021-11-04T09:13:34+5:302021-11-04T10:39:20+5:30
Navjot Singh Sidhu And Amrinder Singh : पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

Navjot Singh Sidhu : "कॅप्टन अमरिंदर सिंग यांना तर पत्नीही साथ देत नाही, तर मग दुसरं कोण कसं उभं राहणार?"
नवी दिल्ली - पंजाबचे माजी मुख्यमंत्री (Former CM Punjab) कॅप्टन अमरिंदर सिंग (Amrinder Singh) यांनी अखेर काँग्रेस पक्षाचा हात सोडला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून यासंदर्भातील पत्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे पाठवलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण काँग्रेसचाही राजीनामा देणार असल्याचं त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचाही राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. यासोबतच त्यांनी आपल्या नव्या पक्षाचीही घोषणा केली आहे. याच दरम्यान पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "अमरिंदर यांची पत्नी देखील त्यांच्यासोबत उभी राहत नाही. तर मग इतर कोण त्यांच्या पाठीशी कसं उभं राहणार?" अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. त्यांची पत्नी परनीत कौर यांना कोणी तरी विचारा, त्या काँग्रेसचा राजीनामा देणार आहेत की नाही? वाळू माफियांना अमरिंदर सिंग घाबरले असंही सिद्धू यांनी म्हटलं आहे. भाजपात जाणार असल्याच्या चर्चेवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कॅप्टन लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील म्हटलं आहे.
अमरिंदर सिंग यांनी आपल्या नव्या पक्षाला पंजाब लोक काँग्रेस असं नाव दिलं आहे. आपण पंजाबमधील सर्व 117 जागा लढवू असंही त्यांनी सांगितलं होतं. याशिवाय भाजपसोबत युती केली जाईल का नाही यावरही त्यांनी भाष्य केलं होतं. "मी भाजपसोबत युती करण्याबाबत कधीही वक्तव्य केलं नव्हतं. आम्ही सीट शेअर करू शकतो. याबाबत भाजपशी चर्चा झाली नसली तरी यावर विचार करत आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
काँग्रेसवरही साधला होता निशाणा
अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंतर पक्षामध्ये माझा अपमान होत असल्याचं सांगितलं होतं. अमरिंदर यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबमधील राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या. "काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये 15 जागा मिळणंही मुश्कील "असल्याचं म्हणत त्यांनी सणसणीत टोला लगावला होता. परनीत कौर यांनी "अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये 117 पैकी 15 जागाही पक्षाला जिंकता येणार नाहीत," असंही म्हटलं होतं.