सॅल्युट तिरंग्याला की कॅमेऱ्याला? तिरंग्याला सलामी देताना IAS टीना डाबींची दिशा चुकली; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 15:25 IST2026-01-26T15:11:55+5:302026-01-26T15:25:34+5:30
झेंडा वंदनानंतर टीना दाबी यांनी चुकीच्या दिशेने सॅल्युट केल्याने त्या ट्रोल झाल्या आहेत.

सॅल्युट तिरंग्याला की कॅमेऱ्याला? तिरंग्याला सलामी देताना IAS टीना डाबींची दिशा चुकली; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
IAS Tina Dabi: देशातील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी टीना डाबी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. ७७ व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करताना त्यांच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. झेंडा वंदनानंतर सलामी देताना टीना डाबी यांचे लक्ष ध्वजाऐवजी समोर असलेल्या कॅमेऱ्यांकडे गेल्याने त्यांची दिशा चुकली, असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
बाडमेर जिल्हा मुख्यालयी आयोजित मुख्य समारंभात जिल्हाधिकारी म्हणून टीना डाबी यांनी झेंडा वंदने केले. राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर जेव्हा राष्ट्रध्वजाला सलामी देण्याची वेळ आली, तेव्हा टीना डाबी काही क्षणांसाठी गोंधळल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ध्वजाकडे तोंड करून सलामी देण्याऐवजी, त्यांचे लक्ष समोर असलेल्या कॅमेऱ्यांकडे होते. कॅमेरा दिसताच त्यांची नजर आणि सलामीची दिशा त्या बाजूला वळली. त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानाने इशारा केल्यानंतर त्यांनी तत्काळ स्वतःला सावरले आणि दिशा बदलली, मात्र तोपर्यंत हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता.
'कॅमेरा कल्चर'वर टीकेची झोड
युपीएससी टॉपर राहिलेल्या आणि सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या टीना डाबी यांची ओळख एखाद्या स्टारसारखी आहे. मात्र, याच लोकप्रियतेमुळे त्या आता टीकेच्या निशाण्यावर आल्या आहेत. "प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी कर्तव्यापेक्षा स्वतःची प्रतिमा आणि कॅमेऱ्यात दिसणे महत्त्वाचे आहे का? असा सवाल नेटकरी विचारत आहेत.झेंडा वंदनाचा मूळ प्रोटोकॉल विसरणे हा निष्काळजीपणा असल्याची टीका केली जात आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. एका गटाच्या मते, हा तिरंग्याचा आणि पदाच्या प्रतिष्ठेचा अपमान आहे. तर समर्थकांनी ही केवळ एक मानवी चूक असल्याचे म्हटले आहे. घाईघाईत किंवा गर्दीमुळे दिशा चुकणे स्वाभाविक आहे, असे समर्थन डाबींच्या चाहत्यांनी केले आहे.
टीना डाबी यांनी काय दिले स्पष्टीकरण?
वाढता वाद पाहून टीना डाबी यांनी यावर आपली बाजू मांडली आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "कलेक्ट्रेट परिसरात ध्वजारोहण करताना माझ्या दोन्ही बाजूंना कर्मचारी उभे होते. त्यांना पाहताना मी स्वाभाविकपणे थोडी तिरपी उभी राहिले होते. मात्र, पुढच्याच क्षणी मी माझी दिशा दुरुस्त केली. यामध्ये कोणताही अनादर किंवा निष्काळजीपणाचा हेतू नव्हता, ही एक सामान्य स्थिती होती."